मुंबईत विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई; २७ गुन्हे दाखल  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईत विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई; २७ गुन्हे दाखल

दिवाळी आणि सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांनी विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. अधिकृत परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री, साठवणूक, सार्वजनिक प्रदर्शन किंवा वाहतूक करण्यास मनाई करणारे आदेश मोडल्याप्रकरणी २७ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.

Swapnil S

मुंबई : दिवाळी आणि सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांनी विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली आहे. अधिकृत परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री, साठवणूक, सार्वजनिक प्रदर्शन किंवा वाहतूक करण्यास मनाई करणारे आदेश मोडल्याप्रकरणी २७ एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात सुरक्षितता राखण्यासाठी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान ही पोलीस मोहीम राबवण्यात आली.

३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत लागू असलेल्या या आदेशाचा उद्देश नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, गैरसोय, धोका किंवा हानीपासून वाचवणे हा आहे. या आदेशानुसार, पोलीस आयुक्त किंवा राज्य सरकारद्वारे अधिकृत अधिकाऱ्याकडून परवाना घेतल्याशिवाय कोणतीही व्यक्ती फटाक्यांची विक्री, साठवणूक, प्रदर्शन किंवा वाहतूक करू शकत नाही.

या आदेशात माहूल परिसरातील ‘भारत पेट्रोलियम’ आणि ‘हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या बॉटलिंग प्लांटसाठी विशेष सुरक्षा व्यवस्थांचेही निर्देश देण्यात आले आहेत. या प्लांटच्या आणि संबंधित सुविधांच्या ५०० मीटर परिसराला ‘संवेदनशील क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. या भागात फटाके फोडणे, फेकणे किंवा रॉकेटसारखी स्फोटक साधने सोडण्यास सक्त मनाई आहे. पेट्रोलियम प्लांटच्या परिसरात अपघात टाळण्यासाठी हा उपाय योजण्यात आला आहे.

दरम्यान, जोगेश्वरी पोलिसांनी जोगेश्वरी स्टेशन रोडवरील हिंदुस्तान हॉटेलजवळ कारवाई केली. आवश्यक परवानगी नसताना पदपथावर लाकडी टेबल मांडून फटाके विकल्याप्रकरणी रुपेश खन्ना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अवैध फटाके विक्रेत्यांवर बडगा

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्याचे सत्र सुरूच आहे. वरळी कोळीवाडा येथील संतोष गुप्ता याने गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता फटाक्यांचे दुकान थाटल्याने त्याच्यावर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कुर्ला पोलिसांनी मालाड पूर्व येथील रहिवासी सुनील गुसा याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासातून असे समोर आले की, तो मालाड पूर्व येथील एका शाळेजवळ सार्वजनिक रस्त्यावर लाकडी टेबल मांडून फटाके विकत होता. त्याच्याकडे फटाके विकण्यासाठी कोणताही परवाना नव्हता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मदर डेअरी, अमूल दूध महागले; प्रतिलिटर २ ते ४ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू

Mumbai : दिवाळीत हवेचे 'दिवाळे'! नेव्ही नगरमध्ये AQI ४९७, तर शिवडीत ४५२ वर पोहोचला

राज्यात लवकरच समान नागरी कायदा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

सायबर चोरांचा उच्छाद! राज्यात दररोज ८.७२ कोटींचा गंडा; आठ महिन्यांत २,११९ कोटींची फसवणूक

अमेरिकेची कोंडी की चीनची बाजी?