अवैध पद्धतीने निकोटिनयुक्त फ्लेवर्सचा पुरवठा करणाऱ्या हुक्का पार्लरवर मुंबई गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. मुंबईतील उमरखाडी येथे एका गोदामावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३ कोटींपेक्षा अधिक किंमतीचा मोठा साठा जप्त केला. बंदी असलेल्या या हुक्का फ्लेवर्सची विक्री मुंबईमध्ये काही हुक्का पार्लरमध्ये गुप्तपणे सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसक्युब डिस्ट्रीब्युशन एजन्सी एलएलपी’ या कंपनीकडून परदेशी ‘अल बखर’ या ब्रँडचे निकोटिनयुक्त फ्लेवर्स आयात केले जात होते. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये तसेच मुंबईतील अनेक हुक्का पार्लरमध्ये मागणीप्रमाणे हे फ्लेवर्स अवैध पद्धतीने पुरवले जात होते. उमरखाडी येथील गोदामात हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी गोदामावर छापा टाकला.
या छाप्यात १,८३१ बॉक्स निकोटिनयुक्त हुक्का फ्लेवर्स जप्त करण्यात आले. ज्याची एकूण किंमत ३ कोटींहून अधिक होती. या प्रकरणी पोलिसांनी सचिन सुशीलकुमार सुरी (वय ४९) याला ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या कोणत्याही पॅकेटवर Health Warning नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी डोंगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.