दक्षिण मुंबईच्या किनारपट्टीवर मंगळवारी (दि. २५) संध्याकाळी अचानक दाट धुराचे थर पसरल्याने शहराच्या वायू गुणवत्तेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले. नरिमन पॉइंट परिसरासह आसपासच्या भागांमध्ये धुराची दाट चादर पसरल्याचे दृश्य अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केले. दृश्यता घटल्यामुळे अनेकांना धूर की धुके, याबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, प्रदूषणाच्या आकडेवारीमुळे हवेची गुणवत्ता 'धोकादायक' पातळीवर पोहोचल्याचे स्पष्ट केले.
माझगावमध्ये सर्वाधिक प्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, कुलाब्यातील नेव्ही नगरमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) २२३, तर माझगावमध्ये वायू गुणवत्ता निर्देशांक २५३ नोंदवला गेला, जे ‘खराब’ श्रेणीत मोडतात. त्याच वेळी aqi.in च्या नोंदीप्रमाणे, मुंबईचा एकूण वायूप्रदूषण निर्देशांक २११ वर पोहोचला आहे. यामुळे दक्षिण मुंबईपुरते नव्हे तर संपूर्ण महानगर क्षेत्र प्रदूषणाच्या धोकादायक पातळीच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे.
हवेची गुणवत्ता खालवली
किनारपट्टीवर दिसलेला दाट धूर फक्त हवामानातील बदलामुळे नव्हते, तर दूषित कणांचे संकेद्रण वाढल्यामुळे पसरल्याचे समजते. समुद्राच्या वर तरंगणारे धुक्यासारखे थर आणि हवेतील जडपणा यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता लक्षणीय खालावल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. मरीन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट आणि कुलाबा परिसरातून अशा दृश्यांचे असंख्य फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
दाट धुराची कारणं
सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओजमध्ये अरबी समुद्राच्या वर दाट धुक्याची चादर पसरलेली स्पष्ट दिसत होती. मरीन ड्राइव्हसारख्या लोकप्रिय ठिकाणीही दृश्यता मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे नागरिकांनी नोंदवले. किनारपट्टीवर दाट धूर का पसरला? याबाबत हवामानातील बदल, बांधकाम सुरु असणे, औद्योगिक कामं यांसारख्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार, अंधेरी पूर्वेतील चकाला येथे AQI २६०, मालाड पश्चिम येथे २५८, बोरिवलीत २१६ तर पवईत २१५ नोंदवला गेला. काही भागांमध्ये हवा 'मध्यम' दर्जाची होती, ज्यात शिवडी, विलेपार्ले पश्चिम, वरळी आणि वसई यांचा समावेश आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम
या वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. हवेत PM2.5 कणांची संख्या वाढल्यामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, दमा किंवा ॲलर्जी असलेल्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. याव्यतिरिक्त, हृदयविकाराचा धोका देखील वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
असुरक्षित हवेच्या गुणवत्तेमुळे नागरिकांना मास्कचा वापर, बाहेरील व्यायाम टाळणे आणि विशेषतः ज्येष्ठ आणि लहान मुलांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वाढता AQI आणि धुर पाहता तातडीने पावले उचलण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.