मुंबई

गणरायाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! ऑगस्ट महिन्यात साडेतीन हजारांहून अधिक तक्रारी; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मंडळांची चिंता वाढली

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. एका ऑगस्ट महिन्यांतच खड्ड्यांच्या ३,७०४ खड्ड्यांच्या तक्रारी मुंबई महापालिकेच्या पॉटहोल क्विकफिक्स’ ॲप, ‘माय बीएमसी’, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, मार्ग हेल्पलाइन आणि १९१६ हेल्पलाइनवर प्राप्त झाल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेकडून मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत. एका ऑगस्ट महिन्यांतच खड्ड्यांच्या ३,७०४ खड्ड्यांच्या तक्रारी मुंबई महापालिकेच्या पॉटहोल क्विकफिक्स’ ॲप, ‘माय बीएमसी’, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, मार्ग हेल्पलाइन आणि १९१६ हेल्पलाइनवर प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असून शहरातील अनेक भागांमध्ये खड्डे, असमतोल रस्ते यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची चिंता वाढली आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या निदर्शनास मुंबईतील अनेक आगमन-विसर्जन मार्गांची दुरवस्था आली आहे. मुलुंड पूर्वेतील गव्हाणपाडा रोड परिसरातील श्री सावित्री सोसायटी, एकता सोसायटी, महाकाली सोसायटी आणि प्रगती सोसायटी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे लहान-मोठ्या गणेशमूर्तींच्या आगमनासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे स्थानिक मंडळांचे म्हणणे आहे.

‘गव्हाणपाडा-मुलुंडचा राजा’ या श्री गणेश मित्र मंडळाचे उपाध्यक्ष योगेश पराडकर यांनी सांगितले की, संपूर्ण परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. याबाबत महापालिका आणि नवघर पोलिस ठाण्यामार्फत वारंवार तक्रारी करूनही अद्याप दखल घेतलेली नाही. खड्डे न बुजवल्याने आगमन आणि विसर्जन मिरवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जोगेश्वरीतील श्याम नगर, मरोळ मेट्रो स्थानकाजवळील चिमणपाडा, ठाकूरद्वारमधील जगन्नाथ शंकर शेठ रोड, चिराबाजार, काळबादेवी मेट्रो परिसर, कुर्ला पश्चिमेतील मगनलाल नथुराम रोड तसेच सातरस्ता ते मुंबई सेंट्रल मार्गावरील अनेक रस्त्यांचीही अवस्था चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले की, दरवर्षी गणेशोत्सवात खड्डे आणि असमतोल रस्त्यांचा प्रश्न निर्माण होतो. यंदाही मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या महापालिकेकडे पाठविण्यात आल्या आहेत. येत्या दोन शनिवार-रविवारी मोठ्या संख्येने गणेशमूर्तींचे आगमन होणार असल्याने त्याआधी सर्व खड्डे बुजविण्याची गरज आहे.

याशिवाय घाटकोपर पश्चिमेतील जागृती नगर मेट्रो जंक्शन येथे वाहतूक कोंडी, मरोळ ते घाटकोपर अंधेरी-कुर्ला लिंक रोडवरील खड्डे, अनावश्यक स्पीडब्रेकर, केबलच्या लोंबकळणाऱ्या वायरी तसेच जोगेश्वरी पूर्वेतील नटवर नगर परिसरातील अवजड वाहनांची पार्किंग यामुळेही गणेशोत्सव मिरवणुकांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉंक्रीटीकरण संथ गतीने

मुंबईतील सुमारे २,०५० किलोमीटर रस्त्यांपैकी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले असले, तरी अनेक भागांतील कामे अद्याप संथ गतीने सुरू आहेत. २०२३ पासून दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी अजूनही खड्डे आणि असमतोल रस्ते कायम आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सुटे तेलविक्री बंदीविरोधात व्यापारी आक्रमक; सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

डिजिटल अरेस्ट : मुंबईत ED कडून दोघांना अटक

Mumbai : रिक्षा बंदचा फटका! मराठी सक्तीबाबत अफवा, 'रास्ता रोको'; पश्चिम उपनगरांत प्रवाशांची गैरसोय