मुंबई : मुंबई शहरात गेल्या काही महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी तासनतास बत्ती गुल होत असल्याने गिरगाव, दादर, वरळी, सायन, प्रतीक्षानगर या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत. मुंबईत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, गिरगाव परिसरात मेट्रोच्या कामामुळे केबल्सला हानी पोहोचत असल्याची कबुली बैठकीत बेस्ट प्रशासनाने दिली. दरम्यान, अखंडित वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी २० कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
स्वस्त व अखंडित वीजपुरवठा करणारी बेस्ट उपक्रम आशिया खंडातील एकमेव संस्था आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कुलाबा, गिरगावसह, दादर, प्रभादेवी, सायन, वरळी भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या घटना घडत आहेत. बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला.
उपाययोजना करा
वीजपुरवठा खंडित झाल्यावर २ ते १४ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांना जीवघेणा त्रास सहन करावा लागतो. बेस्ट उपक्रमाच्या वतीने याबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा माहिती ग्राहकांना दिली जात नाही, असे गणाचार्य यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी सभा तहकूब न करता यावर सविस्तर चर्चा करून बेस्ट उपक्रमाने ठोस उपायांची माहिती द्यावी अशी मागणी केली व ग्राहकांना तक्रार करता यावी, त्याची तत्काळ नोंद घेता यावी इत्यादीसाठी कॉल सेंटर स्थापन करण्याची मागणी केली. गिरगावसह अन्य भागात सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे ग्राहकांना त्याचा मनस्ताप होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सुधारणा करण्याचे आश्वासन
समिती सदस्य आकाश पुरोहित यांनीही गिरगावात १२ तास वीज नाही, अशी घटना पहिल्यांदाच घडतेय. गेल्या काही वर्षांत उपक्रमात काटकसरीचे प्रयत्न सुरू आहेत. खर्चावरही बंदी होती. त्यामुळे मनुष्यबळासह अन्य काही उपाय नीट होऊ शकल्या नाही. मात्र, यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. गिरगावात वीजपुरवठा सुरळीत राहील याबाबत नक्की प्रयत्न करू, असे आश्वासन बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिले.
२० कोटींच्या आराखड्याला मंजुरी!
वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केबलमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी व वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात व साहित्य उपलब्ध करण्याकरिता २० कोटींच्या कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार अंमलबजावणी केली जाणार आहे.
विद्युत विभागात १२ वर्षे कर्मचाऱ्यांची भरती बंद
समितीच्या बैठकीला उपस्थित विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गिरगावमध्ये मेट्रोची कामांमुळे वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये अनेकदा बिघाड होत असल्याने मान्य केले. विद्युत विभागात १२ वर्षे विविध कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या नाहीत. त्यामुळे ५० टक्के मनुष्यबळातच विद्युत विभागात काम होत असल्याचेही कारण त्यांनी सांगितले. यापुढे वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची हमी देऊ शकता का, असा प्रश्न बेस्ट अधिकाऱ्यांना विचारला.
गायवाडीत विशेष बस तैनात
रहिवाशांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी गिरगाव गायवाडी येथे बेस्टची विशेष बस तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच खोदकामामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करा. लोकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांनी दिला. गिरगावात मंगळवारी मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच बेस्टच्या अधिकाऱ्यांनी वीज प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी केली.