मुंबई : मुंबईकरांना सार्वजनिक स्वच्छतागृहांची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या शौचालय उभारणीच्या कामांमध्ये बांधकाम पूर्ण होणे आणि प्रत्यक्ष सुविधा सुरू होणे यामध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या लॉट-१२ अंतर्गत शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये एकूण २८१ शौचालय ब्लॉकच्या कामांसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यापैकी २०६ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी विशेष स्वच्छता प्रकल्पांतर्गत (एसएसपी) बांधण्यात आलेल्या १२१ ब्लॉकपैकी केवळ ९२ ब्लॉक कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित २९ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण होऊनही ते अद्याप सुरू झालेले नाहीत.
प्रभाग स्तरावरील कामांची स्थितीही लक्षवेधी आहे. या स्तरावर १५१ शौचालय ब्लॉकच्या कामांसाठी कार्यादेश देण्यात आले असून त्यापैकी ८५ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, या ब्लॉकपैकी किती शौचालये प्रत्यक्ष सुरू झाली आहेत, याची माहिती उपलब्ध आकडेवारीत नमूद करण्यात आलेली नाही. प्रभाग स्तरावरील ४७ ठिकाणी कामे अद्याप सुरू आहेत. याशिवाय १९ कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईकर नोकरदार तसेच मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्यानंतर शौचालयासाठी जातात. मात्र, काही ठिकाणी शौचालये असूनही योग्य त्या सुविधा नसल्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात कुंचबणा होते.
२९ ब्लॉकची प्रतीक्षा
तिन्ही विभागांतील विशेष स्वच्छता प्रकल्पाची एकत्रित आकडेवारी पाहता, १३० ब्लॉकसाठी कार्यादेश देण्यात आले असून, १२१ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ९२ ब्लॉक सुरू झाले असून, २९ ब्लॉक कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. उर्वरित नऊ ठिकाणी कामे सुरू आहेत.
प्रभाग स्तरावरील कामे संथगतीने
प्रभाग स्तरावरील कामांमध्ये पश्चिम उपनगरांची स्थिती विशेष लक्षवेधी आहे. या विभागात ८७ शौचालय ब्लॉकसाठी कार्यादेश देण्यात आले असून, त्यापैकी केवळ ३० ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ३८ ठिकाणी कामे सुरू आहेत. उर्वरित १९ कामांची स्थिती या आकडेवारीवरून स्पष्ट होत नाही.
विशेष स्वच्छता प्रकल्पांतर्गत शहर विभागात २३ शौचालय ब्लॉकसाठी कार्यादेश देण्यात आले. त्यापैकी २१ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले असून, १६ शौचालये सुरू झाली आहेत. उर्वरित पाच ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी ते अद्याप कार्यान्वित झालेले नाहीत.
पूर्व उपनगरांमध्ये या प्रकल्पांतर्गत ५८ ब्लॉकसाठी कार्यादेश देण्यात आले. त्यापैकी ५२ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यातील ४० शौचालये सुरू झाली असून, १२ ब्लॉक अद्याप सुरू होणे बाकी आहे. सहा ठिकाणी कामे सुरू आहेत.
पश्चिम उपनगरांमध्ये विशेष स्वच्छता प्रकल्पांतर्गत ४९ ब्लॉकसाठी कार्यादेश देण्यात आले. त्यापैकी ४८ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण झाले असून, ३६ शौचालये कार्यान्वित झाली आहेत. मात्र, १२ ब्लॉकचे बांधकाम पूर्ण होऊनही त्यांचा वापर सुरू झालेला नाही. एका ठिकाणी काम सुरू आहे.