रैना असायनार/नवी मुंबई
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील कनेक्टिंग लिंकच्या बोगद्यांची रचना, तांत्रिक बाबी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन, या मार्गावरून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पिकअप व्हॅन आणि टाटा एससारख्या हलक्या व्यावसायिक वाहनांचाही समावेश आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही बंदी लागू होणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत देण्यात आली आहे.
नव्या नियमांमुळे यापूर्वी कनेक्टिंग लिंकवरून प्रवास करण्याची परवानगी असलेल्या हलक्या व्यावसायिक वाहनांनाही आता या मार्गाचा वापर करता येणार नाही. १ नोव्हेंबरपासून सर्व मालवाहू वाहनांना मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाच्या जुन्या किंवा मूळ मार्गिकेचा वापर करावा लागणार आहे, असे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी खासगी कार, जीप आणि वाहतुकीसाठी वापरात नसलेल्या अन्य हलक्या मोटार वाहनांना कनेक्टिंग लिंकवरून प्रवास करण्याची परवानगी कायम राहणार आहे. प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहनांनाही या मार्गावरून जाण्यास मुभा असेल.
अधिसूचनेनुसार, खासगी कार आणि इतर हलक्या मोटार वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर, तर प्रवासी बस आणि अन्य प्रवासी वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
ज्वलनशील, स्फोटक किंवा अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही कनेक्टिंग लिंकवर प्रवेशबंदी असेल. अशा वाहनांना जुन्या द्रुतगती महामार्गावरूनच प्रवास करावा लागणार आहे.