संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबईवर ‘पाणीबाणी’चे संकट! तलावांमध्ये केवळ १० टक्के पाणी; ...तर राखीव पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांकडे सध्या पावसाने पाठ फिरवल्याने तलावांतील उपलब्ध पाणीसाठा दिवसेंदिवस तळ गाठत आहे. सध्या सात तलावांत १,४५,७१३ दशलक्ष लिटर म्हणजे केवळ १०.०७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांवर ‘पाणीबाणी’चे संकट गडद झाले आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांकडे सध्या पावसाने पाठ फिरवल्याने तलावांतील उपलब्ध पाणीसाठा दिवसेंदिवस तळ गाठत आहे. सध्या सात तलावांत १,४५,७१३ दशलक्ष लिटर म्हणजे केवळ १०.०७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांवर ‘पाणीबाणी’चे संकट गडद झाले आहे.

मुंबईच्या तलावांतील पाणीसाठ्याची परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेने यापूर्वीच शासनाकडून राखीव पाणीसाठा मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत अपेक्षित पाऊस न पडल्यास राखीव पाणीसाठ्यातून पाणीपुरवठा करण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी पाणीकपातही केली जाऊ शकते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

मुंबईला तानसा, भातसा, तुळशी, विहार, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा आणि मोडक सागर या सात तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठा २५ मे रोजी १,२१,४१९ दशलक्ष लिटर म्हणजेच ८.३९ टक्के इतका शिल्लक होता. सदर पाणीसाठा त्यावेळी जून २०२४ पर्यंत पुरेल इतका होता. त्यामुळे त्यावेळी महापालिकेने २५ मे रोजी पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई महापालिकेसह ठाणे, भिवंडी, निजामपूर क्षेत्रात ३० मे २०२४ पासून ५ टक्के, तर ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लादली होती. मात्र, जुलै महिन्यात सात तलावांत जोरदार पाऊस पडल्याने २५ जुलै २०२४ पर्यंत सातपैकी चार तलाव भरून वाहू लागले होते. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे जर सात तलावांत जोरदार पाऊस पडला तरच सात तलावांतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होऊन पाणीकपातीचे संकट टळू शकेल, असे सांगितले जात आहे.

मुंबईला सध्या दररोज ४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तर, पावसाळा संपल्यावर १ ऑक्टोबरपासून पुढील वर्षभरासाठी मुंबईला किमान १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते, अशी माहिती प्रशासनाने दिली.

BMC Elections Results 2026 : लढाई संपलेली नाही! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

BMC Elections : शिंदे सेनेचा सावध पवित्रा; नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्ये; अडीच वर्षे महापौरपदासाठी शिंदेचे दबावतंत्र

अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत

पोलिसांसाठी ४५ हजार घरे बांधणार; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

'मीडिया ट्रायल' धोकादायक; ज्येष्ठ विधिज्ज्ञ मुकुल रोहटगी यांचे प्रतिपादन