संग्रहित छायाचित्र 
मुंबई

धरण क्षेत्रात पावसाची स्लो इनिंग! ऑक्टोबर अखेरपर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका पाणीसाठा

Swapnil S

मुंबई : उशिराने एंट्री केल्याने पावसाची मुंबईतही स्लो इनिंग सुरू आहे. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. धरण क्षेत्रात वरुणराजाची कृपा राहिल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या ४८ तासांत महिनाभराचे पाणी जमा झाले आहे. सद्यस्थितीत सातही धरणात ५ लाख ८ हजार १०८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाल्याने ऑक्टोबरपर्यंत मुंबईची तहान भागवेल, इतका पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाची अशीच बॅटिंग सुरू राहिली तर लवकरच मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपातीचे संकट दूर होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरू राहण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यानुसार वर्षभराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब लागल्याने तलाव तळ गाठत आहेत. त्यामुळे १० ते २० टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाते. २०२२ मध्ये १७ ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र २०२३ मध्ये २९ सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव ५ ते ७ टक्के जादा मिळणारे पाणी २०२४ साठी मिळालेच नाही. पण १ ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे यावर्षी पाण्याची तूट निर्माण झाली. त्यामुळे मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र सद्यस्थितीत धरण क्षेत्रात होणारा दमदार पाऊस पाहता समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

जून महिन्यात पावसाने जवळपास दडी मारली होती. २१ जून रोजी मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले होते. त्यानंतर मुंबईत खऱ्या अर्थाने मान्सून सक्रिय झाला, असे बोलले जात होते. मात्र त्यानंतर वरुणराजा जणू गायबच झाला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावली असून अधूनमधून मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होत आहे. मात्र मुंबईकरांना अपेक्षित असलेला पाऊस अद्यापही झालेला नाही. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. मात्र जुलै महिना अर्धा संपायला आला तरी पाऊस अद्याप दमदार बसरलाच नाही. त्यामुळे जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाची धुव्वाधार बॅटिंग होईल आणि मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा जमा होईल, असा विश्वास मुंबईकरांना वाटत आहे.

सध्या उपलब्ध पाणीसाठा

(दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा १२,८९९

मोडक सागर ७१,२०५

तानसा १,०२,६११

मध्य वैतरणा ६१,०६६

भातसा २,३८,९५९

विहार १४,९५५

तुळशी ६,४१३

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला