मुंबई : बुधवार रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गाला झोडपून काढले. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता शुक्रवार सकाळपर्यंत मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आले; मात्र शुक्रवारी वरुणराजाने विश्रांती घेतल्याने उकाडा जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाले. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबई ठाणे जोरदार सरी बरसण्याची शक्यता असून, मुंबई ठाण्यात यलो अलर्ट, तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरुवारी मुंबईत पावसाने संततधार सुरू ठेवत मुंबईला झोडपून काढले. सखल भागात पाणी साचले. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. पावसामुळे संपूर्ण मुंबई विस्कळीत झाली. पावसामुळे पाणी साचल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. गुरुवारी धो-धो कोसळल्यानंतर शुक्रवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून ढगाळ वातावरण तर मधूनच उन पडल्याने वातावरणातला गारवा जाऊन उकाडा जाणवला. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यामुळे जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे विस्कळीत होणारी मुंबई शुक्रवारी पूर्वपदावर आली. दरम्यान, येत्या २४ तासांत जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर अधून मधून ६० ते ७० किमी प्रतीतास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची नोंद
शहर - ०.८३ मिमी
पूर्व उपनगर - २.२१ मिमी
पश्चिम उपनगर - १.७२ मिमी