मुंबई

लाल मिरचीच्या वाढत्या दराचा ठसका

देवांग भागवत

होळीनंतर येणारा उन्हाळा डोळ्यासमोर ठेवून गृहिणींची मसाले बनवण्यासाठी लगबग सुरू होते. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या ३ दिवसांपासून लाल मिरचीसह अन्य मसाले पदार्थ खरेदी करण्यासाठी गृहिणींची गर्दी दिसून येत आहे; मात्र यंदा उत्पादन अल्पप्रमाणात झाल्याने बाजारात सर्व प्रकारच्या लाल मिरच्यांच्या दरात गतवर्षीपेक्षा जवळपास ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये संकेश्वरी आणि काश्मिरी मिरच्यांचे दर सर्वाधिक कडाडले असल्याची माहिती व्यापारी अमरीश जैन यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी थेट पणनाचा कायदा आल्यानंतर बाजार खुले झाले आहेत. याचा कमी अधिक प्रमाणात फायदा-तोटा उत्पदक, व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. अशातच गतवर्षीपेक्षा यंदा लाल मिरच्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी एपीएमसी बाजारात दाखल होणाऱ्या मिरच्यांची आवक कमी असून, दरात मात्र सर्वाधिक वाढ झाली आहे. गतवर्षी ८० ते १०० गाड्या आवक दिवसाला होत असताना यंदा मात्र अवघ्या ३० ते ४० गाड्यांची आवक एपीएमसी बाजारात होत आहे. सध्या घाऊक बाजारात अवघ्या १० ते १५ गाड्या बाजारात येत आहेत. आवक घटल्याने सर्व प्रकारच्या मिरच्यांचे दर ३० टक्क्यांनी वाढले आहेत. दरम्यान, होळीनंतर गृहिणींची मसाले बनवण्यासाठीची लगबग सुरू होते. यासाठी काश्मिरी, लवंगी, बेडगी, संकेश्वरी, पांडी, तेजा या मिरच्या मसाल्यासाठी मोठ्या प्रमाणात विकत घेतल्या जातात. परंतु यंदा आवक कमी झाल्यामुळे मिरचीच्या दराने उसळी घेतली आहे. भविष्यात दरात अणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापारी शंकर बाबर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, व्यापाऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत असला, तरी दुसऱ्या बाजूला गृहिणींचे बजेट मात्र काहीसे कोलमडते आहे.

तयार मसाले महागले!

एपीएमसीत मुख्यत्वे केरळ आणि अन्य राज्यातून खडा मसाल्याची आवक होते. खडा मसाल्यात काळी मिरी, जायपत्री, काळी वेलची आणि हिरवी वेलची यांच्या किमतीत ५ ते १० टक्के वाढ झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्यावर्षी काळी मिरी ५३० ते ७२० रुपये किलोने विकण्यात येत होती. ती या वर्षी ५६० ते ७६० रुपये प्रति किलो आहे. हिरवी वेलची १६०० ते १८०० रुपये प्रति किलो भावाने मिळत होती. ती या वर्षी १८०० ते २००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. जायपत्री २१०० रुपये प्रति किलो भावाने विकली जात होती; ती या वर्षी भाववाढ होऊन २,३६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मिरचीचे भाव स्थिर असले तरी मिरचीपूड आणि तयार मसाले ५ ते १० टक्क्यांनी महागले आहेत.

लाल मिरचीच्या विविध प्रकारांचा बाजारभाव (प्रतिकिलो)

* काश्मिरी - ६०० ते ७०० रुपये

* तेजा - २३८ रुपये

* पांडी - ३०० ते ४०० रुपये

* बेडगी - ५०० ते ६०० रुपये

* लवंगी - ३५० ते ४५० रुपये

* संकेश्वरी - १ हजार ते २ हजार रुपये

अवकाळी पावसाने खूप नुकसान केले. येणारा माल खूप आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. सध्या मार्केट परिसरात गृहिणींची वर्दळ कमी आहे. त्यात १५ एप्रिलनंतर सर्व गावी जातात. त्यामुळे यंदा बराच माल शिल्लक राहणार असल्याचे वाटत आहे. संकेश्वरी मिरचीचे दर सर्वाधिक आहेत. पण ती मिरची देखील आता मार्केटमध्ये आवक कमी येत आहे.

- अमरेश बारोट, मसाल्याचे व्यापारी

एप्रिलमध्ये ऊन चांगले असल्याने मिरची चांगली सुकली आहे. या महिन्यात तयार करून ठेवलेले मसाले वर्षभर टिकतात. किमतीत दरवर्षी किरकोळ वाढ होतच असते.

- सुनीता कामठे, गृहिणी

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस