तांदळाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! शालेय पोषण आहारातील पुरवठा साखळीची चौकशी करा; किशोरी पेडणेकरांची मागणी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

तांदळाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! शालेय पोषण आहारातील पुरवठा साखळीची चौकशी करा; किशोरी पेडणेकरांची मागणी

शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, धान्यात प्लास्टिकसदृश कण आणि खाण्यायोग्य नसलेले संशयित घटक आढळत असल्याचा आरोप मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

Swapnil S

मुंबई : शालेय पोषण आहारासाठी पुरविण्यात येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, धान्यात प्लास्टिकसदृश कण आणि खाण्यायोग्य नसलेले संशयित घटक आढळत असल्याचा आरोप मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. या प्रकरणाची प्रयोगशाळेत तपासणी करून संपूर्ण पुरवठा साखळीची चौकशी करावी, निकृष्ट धान्याचा पुरवठा तातडीने थांबवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याचवेळी वर्सोवा लिंक रोडसह विविध विकासकामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शालेय पोषण आहार हा लहान मुलांच्या आरोग्याशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. ५ ते १२ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होता कामा नये, असे पेडणेकर यांनी स्पष्ट केले. तांदळामध्ये गहू, तुटलेले दाणे आणि संशयास्पद कण आढळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन संबंधित नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

शालेय पोषण आहारासाठी तांदूळ कुठून खरेदी केला जातो, त्याची साठवणूक कोणत्या गोदामांमध्ये होते, गुणवत्तेची तपासणी कोण करतो आणि शाळांपर्यंत धान्य पोहोचविण्याची जबाबदारी कोणाची, असे सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केले. कारवाईच्या वेळी वाहनचालक किंवा क्लिनर यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाते; मात्र पुरवठादार, गोदाममालक आणि वितरण साखळीतील अन्य संबंधित घटकांवर कारवाई होते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आनंदपूर इंडस्ट्री, मिराज इंडस्ट्री आणि पडघा येथील गोदामांचा उल्लेख करत त्यांनी धान्याच्या साठवणुकीपासून वितरणापर्यंतच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली. आकाश ग्राहक सहकारी संस्थेवरील कारवाईचा संदर्भ देत, केवळ एखाद्या संस्थेपुरती कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण पुरवठा व्यवस्थेतील जबाबदार व्यक्ती निश्चित कराव्यात, असे त्या म्हणाल्या.

निकृष्ट आहाराचा पुरवठा थांबवा!

शालेय पोषण आहारातील चवळी, मटकी आणि अन्य खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतही पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. मुलांना दिला जाणारा आहार खाण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आहार तयार करणाऱ्या संस्थांकडे आवश्यक स्वयंपाकघर आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी व्हावी, असे त्यांनी सांगितले. संशयास्पद धान्याचे नमुने तपासून त्याची गुणवत्ता निश्चित करावी, निकृष्ट धान्याचा पुरवठा थांबवावा आणि दोषी आढळणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करावी, अशी मागणी त्यांनी केली.

विकासकामांसाठी वृक्षतोड कशाला?

शालेय पोषण आहाराच्या प्रश्नाबरोबरच पेडणेकर यांनी विकासकामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरही संताप व्यक्त केला. वर्सोवा लिंक रोडसाठी पर्यायी आराखडा स्वीकारला असता, तर मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड टाळता आली असती, असे त्या म्हणाल्या. केवळ खर्च वाचविण्याच्या उद्देशाने रस्त्याचा मार्ग बदलण्यात आल्याचा आरोप करताना, या प्रक्रियेत मोठ्या बागेचे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. या परिसरातील सुमारे ९८ वर्षे जुन्या वडाच्या झाडाचाही त्यांनी उल्लेख केला. वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होण्याचा आणि पर्यावरणीय समतोल बिघडण्याचा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जलसंपदा विभागात ३९,७२२ पदभरती; आकृतीबंध मंजूर; वाढीव ११० सिंचन शाखा, भूसंपादन, कृषी, सिंचन सहाय्यकाचे नवे पद

मुंबई, कोकणातील शिक्षकांना मोठा दिलासा; सोमवार ते शुक्रवार केवळ अध्यापनाचे काम, माहिती संकलनासाठी शनिवार निश्चित

मुंबई, ठाणे, भिवंडीकरांनो पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन

Mumbai : पालिका अभियंत्यांच्या ऑनलाइन बदल्यांचा उतारा! महिनाभरात बदलीच्या ठिकाणी रूजू व्हा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठीही निकष; ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीची अट ठरणार जाचक