मुंबई

मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांचा पाहुण्या वक्त्यावर लैंगिक छळाचा आरोप

१० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी लैंगिक छळ आणि अयोग्य वर्तनाचे आरोप आमंत्रित पाहुण्या वक्त्यावर केले आहेत. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये हिंदी विभागाच्या कार्यक्रमात एक धक्कादायक घटना घडली. ‘अंतास’ या वार्षिक महोत्सवात एका पाहुण्या वक्त्याने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर तक्रारी समोर आल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली आहे.

सोमवारी (दि. २४) सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये हिंदी विभागाने राष्ट्रीय सेमिनार आयोजित केला होता. यामध्ये निमंत्रित केलेल्या पाहुण्या वक्त्याने विद्यार्थ्यांशी गैरवर्तन केले. १० पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी लैंगिक छळ आणि अयोग्य वर्तनाचे आरोप त्या वक्त्यावर केले आहेत. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

'मिड-डे'च्या बातमीनुसार, या वक्त्याला रविवारी (दि. २३) कॉलेज कॅम्पसमध्ये गेस्ट रूम देण्यात आली होती. मात्र, त्या वक्त्याने काही तासांतच विद्यार्थ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आधी त्याने पानमसाला मागितला. कॉलेज परिसरात ते आणायला बंदी असल्याचं स्वयंसेवकांनी त्याला सांगितले. तरीही त्याने पुन्हा पानमसाल्याची मागणी केली. म्हणून, एका स्वयंसेवकाने गेस्ट रूममध्ये पानमसाला पोहोचवला. त्यावेळी तो वक्ता नग्न अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्या वक्त्याने कॅम्पसमध्ये फिरून विद्यार्थिनींचे फोटो परवानगी न घेता काढले होते. त्याने मुलींचे मोबाईल नंबर मागितले होते. इतकंच नाही, तर एका विद्यार्थिनीची त्याने छेड काढली, असा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. त्यांच्या फोनमध्ये विद्यार्थिनींचे फोटो आढळल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

तक्रारी असूनही कारवाई उशिरा

२४ नोव्हेंबरच्या दुपारी शिक्षक आणि इंटर्नल कम्प्लेंट कमिटी (ICC) पर्यंत पोहचल्या होत्या. मात्र, प्राचार्य उपस्थित नसल्याने तत्काळ याबाबत निर्णय झाला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सायंकाळपर्यंत परिस्थिती चिघळली आणि स्वयंसेवकांनी एकत्र येऊन स्पष्टपणे सांगितले की, “वक्त्यावर कारवाई न झाल्यास कार्यक्रमात पुढे काम करणार नाही.”

रात्री ८ वाजता विद्यार्थ्यांना त्या वक्त्याला कॅम्पसच्या बाहेर सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने काय चूक केली आहे किंवा काय घडलं आहे, याबद्दल त्याला कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

"आम्ही नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी"

या घटनेनंतर 'अंतास' कडून एक निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले की, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आमच्या हिंदी विभागाच्या राष्ट्रीय चर्चासत्रात, एका आमंत्रित पाहुण्याने असे वर्तन केले जे पूर्णपणे चुकीचे होते आणि आमच्या स्वयंसेवक आणि टीम सदस्यांबद्दल, विशेषतः आमच्या महिला स्वयंसेवकांबद्दल अत्यंत अनादर करणारे होते. अशी घटना पुन्हा होऊ नये आणि त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात यावी, याची खात्री करण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी सक्रियपणे या प्रकरणाची दखल घेत आहोत. आम्ही नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहतो." असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

कॉलेज प्रशासनाचे मत

प्राचार्या डॉ. करूणा गोकर्ण यांनी 'मिड-डे' शी बोलताना सांगितले, "संबंधित वक्त्याचे गैरवर्तन कॉलेजने पाहिले आणि त्याच दिवशी त्यांना ताबडतोब परिसर सोडण्याचे सांगितले. सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थिनींनी ICC कडे लेखी तक्रार द्यावी," असे आवाहनही त्यांनी केले.

कॉलेज प्रशासन घटनाच दडपून टाकत होते - विद्यार्थ्यांचा आरोप

'मिड-डे' ने दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे की, कॉलेज प्रशासनाने हे प्रकरण दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. 'अंतास'च्या आयोजन समितीतील विद्यार्थ्यांच्या मते, प्राचार्यांनी त्यांना "या विषयावर कोणीही सार्वजनिकरित्या बोलू नये", तसेच "कॉलेज या घटनेची कायदेशीर कारवाई करणार नाही", असे संकेत दिले आहेत.

या प्रकरणात अद्याप कॉलेजकडून अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र, विद्यार्थ्यांनी न्याय मिळावा आणि सर्व तक्रारींची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल; राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती

निवडणुका होणारच, पण...; सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा निर्णय

२ डिसेंबरच्या निवडणुकांसाठी सरकारचा निर्देश : मतदारांना भरपगारी रजा द्या, अन्यथा ...

Mumbai : बांधकाम प्रदूषणावर हायकोर्टाची कठोर भूमिका; नियमांच्या अंमलबजावणीसाठी नेमली ५ सदस्यांची समिती

"सीझन २ - पुन्हा मुलगी!" मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; सोशल मीडियावर खास पोस्टसोबत दिली गुड न्यूज