मुंबई

वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी; जागा पकडण्यातून दुर्घटना, १० प्रवासी जखमी, गर्दीमुळे 'या' स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

Mumbai : वांद्रे टर्मिनसवर शनिवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्यानंतर मध्य तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीचा निर्णय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे.

Swapnil S

मुंबई : वांद्रे टर्मिनसवर फलाट क्रमांक-१ वर वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस फलाटावर लागण्यापूर्वीच पकडण्याची घाई प्रवाशांच्या अंगाशी आली. शनिवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास एक्स्प्रेस फलाटावर थांबण्यापूर्वीच जागा पकडण्यासाठी धावणाऱ्या प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत १० प्रवासी जखमी झाले असून, यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या तसेच छटपूजेच्या निमित्ताने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी उसळली आहे. त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गाड्या पकडण्यासाठी गर्दी होत आहे. वांद्रे टर्मिनसवर फलाट क्रमांक-१ वरून ट्रेन क्रमांक २२९२१ वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी सुटणार होती. या गाडीसाठी ५ हजारांहून अधिक प्रवासी फलाटावर थांबले होते. रात्री २ वाजून ४५ मिनिटांनी २२ डब्यांची अंत्योदय एक्स्प्रेस यार्डमधून वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक-१ वर येत होती. यावेळी या गाडीचे दरवाजे बंद होते. यानंतरही काही प्रवाशांनी जागा पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीच्या डब्याचे दरवाजे बंद असल्याने प्रवाशांना गाडीत प्रवेश करता आला नाही. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीमुळे चेंगराचेंगरी झाली. यामध्ये १० प्रवासी जखमी झाले.

दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना प्रथम भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेनंतरही अंत्योदय एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनसवरून आपल्या निर्धारित वेळेवर सुटली.

जखमी प्रवाशांची नावे

शब्बीर अब्दुल रहमान (४०), परमेश्वर सुखदार गुप्ता (२८), रवींद्र हरिहर चुमा (३०), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (२९), संजय तिलकराम कांगे (२७), दिव्यांशू योगेंद्र, यादव (१८), मोहम्मद शरीफ शेख (२५), इंद्रजीत साहनी (१९) आणि नूर मोहम्मद शेख (१८) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. यामध्ये साहनी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

५ हजारांहून अधिक प्रवासी स्थानकात

अंत्योदय एक्स्प्रेस २२ डब्यांची चालविण्यात येते. यामध्ये २०४० इतकी प्रवासी क्षमता आहे. मात्र या गाडीतून प्रवास करण्यासाठी फलाटावर सुमारे ५ हजारांहून अधिक प्रवाशांनी गर्दी केली होती. दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले.

प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

वांद्रे टर्मिनसवर शनिवारी मध्यरात्री चेंगराचेंगरी झाल्यानंतर मध्य तसेच पश्चिम रेल्वे प्रशासनाने तातडीचा निर्णय म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली आहे. पश्चिम रेल्वेने दादर, मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मध्य रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर ८ नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे.

चला, चला दिवाळी आली; खरेदीची वेळ झाली! मुंबईतील बाजारपेठांमध्ये ‘शॉपिंग’साठी तोबा गर्दी

अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार - मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची माहिती

…म्हणून 'आप' महाराष्ट्राच्या निवडणुकीत नाही; मविआने जागा देऊ केल्याचा भारद्वाज यांचा दावा

याद्यांचा धडाका! महायुती व महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार जाहीर

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य : वसंत देशमुख यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात