वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती 
मुंबई

वाढता वाढे बाप्पाची उंची; भुलेश्वर दुर्घटनेनंतर उंच मूर्तींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत १०० हून अधिक उंच मूर्ती; साकीनाक्यात ४२ फुटी सर्वाधिक उंच मूर्ती

काळानुरूप गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले असून उंच गणेश मूर्ती या गणेश भक्तांचे आकर्षण ठरत आहेत.

गिरीश चित्रे

मुंबई : काळानुरूप गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले असून उंच गणेश मूर्ती या गणेश भक्तांचे आकर्षण ठरत आहेत. मात्र भुलेश्वर येथे गणेश मूर्ती कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. त्यामुळे मुंबईतील उंच गणेश मूर्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. उपनगरासह विशेषतः दक्षिण मुंबईत दरवर्षी उंच गणेशमूर्ती विराजमान करण्याची स्पर्धा व परंपरा वाढत असून खेतवाडीसह १०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती २२ फुटांपर्यंत असल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी सांगितले. दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा केली जाते, त्याच भक्तिभावाने विसर्जन दिनी गणेश मूर्तींची काळजी घ्यावी आणि ट्रॉलींपासून लहान मुले, कार्यकर्ते आदींनी लांबच राहावे, असे आवाहन गिरीश वालावलकर यांनी गणेश मंडळांना केले आहे.

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवामध्ये मोठ्या आणि आकर्षक मूर्ती उभारण्याची स्पर्धा वाढली आहे. मंडळांकडून २२ ते २५ फूट उंचीच्या, तर काही ठिकाणी त्याहूनही अधिक उंच गणेश मूर्ती बसविल्या जातात. या मूर्तींच्या उभारणीसाठी लोखंडी संरचना, लाकडी आधार आणि विशेष तांत्रिक यंत्रणेचा वापर केला जातो. मात्र सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास अशा उंच मूर्ती धोकादायक ठरू शकतात, हे भुलेश्वरमधील दुर्घटनेने अधोरेखित केले आहे.

‘गिरगावचा राजा’च्या विसर्जनासाठी विशेष खबरदारी

‘गिरगावचा राजा’ गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा मंडळाचे ९९ वे वर्ष असून बाप्पाच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण विराजमान असल्याची आकर्षक संकल्पना साकारण्यात आली आहे. पुढील वर्षी मंडळाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार असल्याने त्याची तयारीही आतापासूनच सुरू करण्यात आली आहे. गिरगावचा राजा मंडळाच्या २४ फूट उंच गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी ट्रॉलीच्या चारही कोपऱ्यांवर चार अनुभवी जाणकार असतात. मिरवणुकीदरम्यान मूर्तीचा समतोल, हालचाल, वजनाचा दबाव आणि ट्रॉलीवरील ताण यावर हे तज्ज्ञ सतत लक्ष ठेवतात. तसेच ट्रॉली खेचण्यासाठी ५० प्रशिक्षित कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे, असे गिरगावचा राजा मंडळाचे सचिव गणेश लिंगायत यांनी सांगितले.

पवई तलावापर्यंत रस्त्यांची सखोल पहाणी

साकीनाक्याचा महाराजाची गणेश मूर्ती ४२ फूट उंच असून विसर्जनाआधी पवई तलावापर्यंत संपूर्ण रस्त्यांची सखोल पहाणी केली जाते. रस्त्यावर खड्डे, झाडांच्या फांद्यांचा धोका किती याची रेकी केली जाते, असे साकीनाका महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव जॅक जिकमडे यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना सांगितले.

विसर्जन दिनी घेतली जाते योग्य ती खबरदारी

तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती २०११ मध्ये कोसळली होती. त्यावेळी कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र तेव्हापासून मंडळाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जाते. गणेश गल्ली ते गिरगाव चौपाटीपर्यंत संपूर्ण रस्त्यांची पाहणी केली जाते. विसर्जन दिनी खड्डा निदर्शनास आला तर रेतीची गोणी बरोबर असते ती रेती खड्ड्यात टाकतो. विसर्जन दिनी योग्य ती खबरदारी घेतली जाते, असे तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपसचिव संदेश हुके यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईत आहेत उंच गणेश मूर्ती

११ वी गल्ली खेतवाडी, मलबार हिलचा महाराजा, फोर्टचा राजा, चंदनवाडीचा राजा, कुंभारवाडा, कामाठीपुरा, ताडदेवचा राजा, चिंतामणी, गणेश गल्ली, रंगारी बदक चाळ, तेजुकाया, साकीनाकाचा महाराजा अशा १०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत २२ फुटांपर्यंत गणेश मूर्ती आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nepal Floods : नेपाळच्या जलविद्युत बोगद्यांत ५३७ जण अडकले; बोगद्यांमधील बचावकार्याला वेग, भारत, चीन, कोरियाकडून मदत

दिल्लीला कांदा पोहोचला अन् लासलगावात दर घसरला; शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा फटका

पंतप्रधान मोदींना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान

Nepal Floods : नेपाळमधून महाराष्ट्रातील ६९ नागरिकांची सुटका

Thane : खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू