मुंबई : मुंबई हे देश-विदेशातील पर्यटकांसाठी महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. शहरातील विविध पर्यटनस्थळांवर स्वच्छता, सुशोभीकरण, सुरक्षितता, तसेच डिजिटल माहिती प्रणाली यांसारख्या दर्जेदार आणि सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्यावर महानगरपालिकेचा विशेष भर आहे.
देश-विदेशातील पर्यटकांना अधिक दर्जेदार आणि समाधानकारक अनुभव मिळावा, असा मुंबई पालिकेचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी यांची ‘मुंबई पर्यटन’ या विषयावर संयुक्त बैठक शुक्रवारी महापालिका मुख्यालयात पार पडली. त्यावेळी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे बोलत होत्या.
जिल्हाधिकारी (मुंबई शहर जिल्हा) आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख मानसी कोठारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे मुंबई पर्यटनाबाबत विस्तृत माहिती दिली.
मनपाने सहकार्य करावे
एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल म्हणाले की, राज्यातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासन समर्पित आहे. पर्यटन पायाभूत सुविधा वाढवणे, धोरणात्मक योजना तयार करणे आणि शाश्वत पर्यटन उपक्रम राबविणे हे ‘एमटीडीसी’चे मुख्य उद्दिष्ट आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या महानगरास पर्यटन स्थळांचा समृद्ध वारसा आहे. इको- टुरिझम, साहसी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था विशेषत: महानगरपालिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.