मुंबई : मराठी भाषा व महाराष्ट्राविरोधात आक्षेपार्ह व्हॉट्सॲप स्टेटस ठेवल्याच्या आरोपावरून विक्रोळीतील एका दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि बाजारपेठेत धिंड काढली. विक्रोळी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमसिंह देवडा असे या तरुण दुकानदाराचे नाव आहे. तो विक्रोळीतील टागोर नगर मार्केटमध्ये ‘लकी मेडिकल शॉप’ हे दुकान भाड्याने चालवत होता. बुधवारी त्याने व्हॉट्सॲपवर मराठी भाषा व महाराष्ट्राबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड केल्याचा आरोप आहे.
हे स्टेटस स्थानिक मनसे नेते संतोष देसाई यांच्या निदर्शनास आल्यानंतर मनसेचे स्थानिक पदाधिकारी विश्वजीत ढोलम व इतर कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी प्रेमसिंह देवडा याला त्याच्या दुकानाबाहेर गाठून मारहाण केली, माफी मागण्यास भाग पाडले व संपूर्ण मार्केटमध्ये धिंड काढली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.