होळीसाठी लोकलच्या दाराला सुपारीचं झाड बांधून नेणं पडलं महागात; RPF कडून ६ जणांविरोधात गुन्हा 
मुंबई

Mumbai : होळीसाठी लोकलच्या दाराला सुपारीचं झाड बांधून नेणं पडलं महागात; RPF कडून ६ जणांविरोधात गुन्हा

विरारहून माहीमकडे होळी साजरी करण्यासाठी लोकल ट्रेनने जाताना काही प्रवाशांनी सुपारीच्या झाडाचा मोठा खांब लोकलच्या दरवाजाला बांधल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Mayuri Gawade

मुंबईत होळीच्या परंपरेतून विरारहून माहीमकडे जाताना काही प्रवाशांनी लोकल ट्रेनच्या दरवाजाला सुपरीच्या झाडाचा मोठा खांब बांधल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रवाशांना चढताना-उतरताना अडचणी

माहितीनुसार, परंपरागत पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी विरारमधील काही रहिवासी माहीमकडे लोकलने जात होते. या प्रवासादरम्यान त्यांनी लोकलच्या दरवाजाला सुपारीच्या झाडाचा खांब आडव्या स्थितीत बांधला होता. ज्याच्या झावळ्या दरवाज्यात लोंबकळत होत्या. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढताना-उतरताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या प्रकाराची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाला मिळताच तात्काळ कारवाई करण्यात आली.

बोरिवली स्थानकात कारवाई

रविवारी रात्री सुमारे ११.४० वाजता विरार-चर्चगेट लोकल बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर आली असता तेथे कर्तव्यावर असलेल्या स्थानक व्यवस्थापकांनी डब्याची पाहणी केली. त्यावेळी काही व्यक्तींनी डब्याच्या दरवाजाला झाड बांधल्याचे आढळून आले.

या प्रकारामुळे रात्री १२.२४ ते १२.४६ दरम्यान सुमारे २० मिनिटे लोकल सेवेवर परिणाम झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. संबंधित प्रवाशांना लोकलमधून उतरवून त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यालयात नेण्यात आले.

सहा जणांविरोधात गुन्हा

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींनी आपला गुन्हा कबूल केल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी आकाश ढोणे (३३), सागर बने (२२), अनिल कुमार सिंग (२२), अशोक गुंजलप्पा (२७), ब्रह्म देना हुसैन (३८) आणि शेखर कोळी (३७) यांच्याविरोधात रेल्वे अधिनियम कलम १४५ (ब) आणि १४५ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरार-माहीम परंपरेची पार्श्वभूमी

विरार आणि माहीम यांना जोडणारी ही होळीची परंपरा ब्रिटीश काळापासून सुरू असल्याचे सांगितले जाते. माहीममधील मोरी रोड परिसरात पूर्वी कोळी समाजाच्या अनेक चाळी होत्या. पुनर्विकासानंतर या भागातील अनेक कुटुंबे विरारमध्ये स्थायिक झाली. मात्र, सांस्कृतिक नाते जपण्यासाठी दरवर्षी विरारहून माहीमला होळी साजरी करण्यासाठी ते येतात. ढोल-ताशे, नृत्य आणि ‘होळी माते की जय’ असा जयघोष करत लोकलने प्रवास करत मोरी रोड परिसरात होलिका दहनाचा विधी पार पडतो.

शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रेंना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; जामिनाला स्थगिती, पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश

भारताची अंतराळ क्षेत्रात नवी झेप; देशातील पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट Vikram-1 चे यशस्वी प्रक्षेपण

अभिजीत दिपकेंवर शाईफेक; महिला पोलिसांच्या ताब्यात, Video

सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच आंदोलनाला नवे वळण; अभिजीत दिपकेंचं बेमुदत उपोषण सुरू

महिलेची छेड काढणं पडलं महागात! रेल्वेतच तरुणाला घातल्या बांगड्या, लिपस्टिक लावत शिकवला धडा; VIDEO