विरार स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक! रेल्वे रुळांवर उतरून आंदोलन, नक्की काय घडलं? VIDEO प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

विरार स्थानकावर प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक! रेल्वे रुळांवर उतरून आंदोलन, नक्की काय घडलं? VIDEO

विरार स्थानकावर सकाळच्या गर्दीच्या वेळी एसी लोकलच्या निर्णयाविरोधात प्रवाशांनी रुळांवर उतरून आंदोलन केले. यामुळे वेस्टर्न रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत होत अनेक गाड्या उशिराने धावल्या. वाढत्या भाडे आणि कमी झालेल्या नियमित गाड्यांमुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Mayuri Gawade

मुंबई : विरार स्थानकावर सोमवारी सकाळी मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून आंदोलन केल्याने वेस्टर्न रेल्वेवरील लोकल सेवा काही काळ विस्कळीत झाली. ८.२८ वाजताची विरार-चर्चगेट लोकल अचानक एसी सेवेत रूपांतरित केल्याच्या निर्णयामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वेस्टर्न लाईनवरील अनेक गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत असल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पाच मिनिटांच्या अंतरावर दोन एसी गाड्या

प्रवाशांच्या मते, आधीच सकाळी ८.३३ वाजता एसी लोकल सुरू असताना ८.२८ वाजताची आणखी एक गाडी एसी करण्यात आल्याने केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर दोन प्रीमियम गाड्या धावू लागल्या. त्यामुळे नियमित लोकल गाड्यांची संख्या कमी झाल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

प्रवाशांनी स्पष्ट केले की, आधुनिकीकरणाला विरोध नाही; मात्र त्यासाठी सामान्य प्रवाशांच्या सोयींचा बळी दिला जाऊ नये.

दैनंदिन प्रवासावर परिणाम

८.२८ वाजताची विरार-चर्चगेट लोकल ही कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगारांसाठी महत्त्वाची मानली जाते. एसी लोकलचे भाडे जास्त असल्यामुळे अनेक प्रवाशांच्या दैनंदिन खर्चावर याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय आधीच असलेल्या गर्दीच्या समस्येत भर पडत असल्याने उर्वरित गाड्यांमध्ये प्रवास करणे अधिक धोकादायक होत असल्याचीही तक्रार प्रवाशांनी केली.

प्रशासनावर दबाव

प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाला निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. नियमित लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून परिस्थिती सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे मुंबईच्या ‘लाईफलाईन’ मानल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेत सुधारणा करताना प्रवाशांच्या गरजा आणि परवड यांचा समतोल राखण्याचे आव्हान पुन्हा अधोरेखित झाले आहे.

पश्चिम बंगालमधील आसनसोल मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ; खुर्च्या-वाहनांची तोडफोड, VIDEO व्हायरल

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती करा; आमदार रोहित पवारांची मागणी

Baramati By-Election : 'गुलाल नको, मिरवणुका नको'; विजय निश्चित होताच सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कोल्हापुरात ‘शून्य सावली दिवस’ची अनोखी अनुभूती; ६ मे रोजी ५२ सेकंद सावली अदृश्य

मुंबईतील झाडांची होणार शास्त्रीय नोंद; ८ वर्षांनंतर खासगी कंपनी करणार वृक्षगणना; झाडांची संख्या घटली की वाढली हे स्पष्ट होणार