Mumbai : दूध पिताना ठसका, वारंवार न्यूमोनिया बनला प्राणघातक; ६ महिन्यांच्या बाळाच्या दुर्मिळ दोषावर वाडियात यशस्वी उपचार 
मुंबई

Mumbai : दूध पिताना ठसका, वारंवार न्यूमोनिया बनला प्राणघातक; ६ महिन्यांच्या बाळाच्या दुर्मिळ दोषावर वाडियात यशस्वी उपचार

दूध पिताना बाळाला सतत ठसका लागणे, खोकला येणे आणि वारंवार न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने सहा महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Swapnil S

मुंबई : दूध पिताना बाळाला सतत ठसका लागणे, खोकला येणे आणि वारंवार न्यूमोनियाचा त्रास होत असल्याने सहा महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत अन्ननलिका आणि स्वरयंत्र यांच्यामध्ये जन्मजात गंभीर दोष असल्याचे निदान झाले. बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॅार चिल्ड्रन ईएनटी सर्जन डॉ. बालगोपाल कुरुप यांच्या नेतृत्वाखाली, बालरोग फुफ्फुस विकार तज्ज्ञ डॉ. पार्थ चंदने आणि त्यांची टीम तसेच भूलतज्ज्ञ डॉ. मुक्ता शिखरे व टीमने तोंडावाटे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून हा दोष यशस्वीपणे दूर केला. विशेष म्हणजे, मानेवर करावी लागणारी मोठी शस्त्रक्रिया आणि श्वसनासाठी ट्रॅकिओस्टॉमीची गरज टाळली.

जन्मतःच अन्ननलिका आणि स्वरयंत्र यांच्यामध्ये असलेल्या दुर्मिळ दोषामुळे वारंवार न्यूमोनिया आणि श्वसनाच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या सहा महिन्यांच्या बाळावर वाडिया बाल रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले. प्रगत लॅप्रोस्कोपी (तोंडावाटे) उपचार करून शस्त्रक्रियेमुळे बाळाच्या स्वरयंत्रातील गंभीर दोष दुरुस्त करण्यात आला. विशेष म्हणजे, यासाठी मानेवर मोठी शस्त्रक्रिया करण्याची किंवा श्वसनासाठी ट्रॅकिओस्टॉमी करण्याची गरज भासली नाही. उपचारानंतर बाळ पुन्हा स्तनपान स्वीकारू लागले आणि आठवडाभरातच बाळाला घरी सोडण्यात आले.

आव्हानात्मक शस्त्रक्रिया

या आधी अशा गंभीर दोषांवर उपचार करण्यासाठी मानेवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागत असे. तसेच श्वसनासाठी ट्रॅकिओस्टॉमी म्हणजेच मानेतून श्वास घेण्यासाठी कृत्रिम मार्ग तयार करावा लागत असे. दोष बंद करण्यासाठी छातीच्या भिंतीतील कूर्चेचा (कार्टिलेज) वापर करावा लागत असे. मात्र, या बाळाच्या बाबतीत आधुनिक दुर्बिणीद्वारे करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे या सर्व प्रक्रिया टाळता आल्या. बाळाचे वय कमी असल्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.

असे आढळले त्रासाचे मूळ

कल्याण येथे राहणाऱ्या सोनकली आणि अंजनी तिवारी या दाम्पत्याच्या आयुष्यात २ एप्रिल २०२६ रोजी पहिल्या अपत्य म्हणजेच आरवच्या जन्माने आनंदाचे क्षण आले. बाळ चार महिन्यांचे असताना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात त्याला तीव्र न्यूमोनियाचा त्रास झाला तसेच त्याचा आवाजही अत्यंत घोगरा झाला होता. बाळाची प्रकृती लक्षात घेऊन पालकांनी विशेष उपचारांसाठी त्याला वाडिया बाल रुग्णालयात दाखल केले. येथे बालरोग फुफ्फुसविकार तज्ज्ञांच्या टिमने ब्रॉन्कोस्कोपी तपासणी केली. यामध्ये छोट्या दुर्बीणीच्या मदतीने श्वसनमार्गाची पाहणी करून त्रासाचे मूळ कारण शोधण्यात आले.

लॅरिंजियल क्लेफ्ट हा जन्मजात दोष असून यामध्ये अन्ननलिका आणि स्वरयंत्र यांच्यामध्ये एक असामान्य फट असते. त्यामुळे बाळाला दूध किंवा अन्य द्रव पदार्थ गिळताना ते त्याच्या अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जाऊ शकतात. साधारणपणे १० हजार ते २० हजार बाळांपैकी एका बाळामध्ये हा दोष आढळतो. मात्र, टाइप ३ प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. या दोषाची तीव्रता फटीच्या खोलीवर अवलंबून असते. टाइप ३ प्रकारात ही फट मानेच्या भागापर्यंत खोलवर गेलेली असते. त्यामुळे वारंवार छातीचे संसर्ग, श्वास घेण्यास त्रास आणि दूध पिण्यात अडचणी निर्माण होतात. या बाळाच्या बाबतीत तोंडावाटे दुर्बिणीच्या सहाय्याने प्रक्रिया करण्यात आम्हाला यश आले.
डॉ. बालगोपाल कुरुप, वाडिया रुग्णालय, ईएनटी

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय