मुंबईत पाणीकपात कायम; BMC चा निर्णय, धरणात ९७ टक्के पाणीसाठा  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

मुंबईत पाणीकपात कायम; BMC चा निर्णय, धरणात ९७ टक्के पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ९७.१४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा जुलै २०२७ पर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकेल.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ९७.१४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा जुलै २०२७ पर्यंत मुंबईकरांची तहान भागवू शकेल. मात्र ‘एल निनो’चा प्रभाव असल्याने पुढील वर्षी किती पाऊस बरसेल याचा अंदाज नाही. त्यामुळे मुंबईत सुरु असलेली १० टक्के पाणी कपात सुरूच राहणार असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

राज्य सरकारने मुंबई महापालिकेसह सर्व महापालिकांना ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध राहील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातच जागतिक हवामान संघटनेने फेब्रुवारी २०२७ पर्यंत ‘एल निनो’चा प्रभाव कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत हवामान, तापमान आणि पर्जन्यमानावर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पाणीपुरवठ्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबईला स्वतःच्या तलावांव्यतिरिक्त राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील भातसा व अप्पर वैतरणा धरणांमधून राखीव पाण्याचा पुरवठा केला जातो. भातसा धरणातून सुमारे १.४० लाख दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणामधून सुमारे ९३,५०० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला उपलब्ध होते. मात्र राज्यातील जलसंकट तीव्र झाल्यास या राखीव पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

महापालिकेच्या जल अभियंता विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, उर्वरित वर्षासाठी आवश्यक पाण्याचा अंदाज घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. सप्टेंबरअखेर तलावातील जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यासच पाणीकपात मागे घेण्याचा प्रारंभीचा विचार होता.

सात तलावातून होतो पाणीपुरवठा

मुंबईत १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू आहे. मुंबईला मोडक सागर, भातसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि तानसा या सात तलावांतून दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. शहराची वार्षिक गरज भागविण्यासाठी या तलावांमध्ये एकूण १४.४७ लाख दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध असणे गरजेचे असते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

एल निनो संकट तीव्र होणार; पुढील वर्षाचीही तयारी करावी लागेल, फडणवीसांचा इशारा

अशोकजी सिंघल : एक राष्ट्रऋषी

मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ!

आजचे राशिभविष्य, २८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

फायबर अन् व्हिटॅमिन्सचा खजिना; ब्लूबेरी खाण्याचे फायदे एकदा वाचाच