मुंबई : यंदा राज्याच्या विविध भागात दुष्काळ पडलेला असतानाच मुंबईला दररोज पुरवठा होणाऱ्या सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पाण्यापैकी ३४ टक्के पाणी गळती व चोरीमुळे वाया जात असल्याची कबुली प्रशासनाने दिली आहे.
पाणी गळती व पाणी वितरणातील नुकसान किमान १० टक्क्यांनी कमी करण्याचे पालिकेचे लक्ष्य असून, त्यातून सुमारे ५०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी स्थायी समितीला दिली. दरम्यान, धरणातील पाणीसाठा व राज्य सरकारकडून मिळणारा २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा एकत्र केला तर ३१ जुलै २०२७ पर्यंत मुंबईची तहान भागवेल इतका आहे. परंतु ‘एल निनो’मुळे पाऊस कधी व किती पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाण्यावर स्थायी समितीत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी त्यांनी स्थायी समिती अध्यक्षांसह समिती सदस्यांना माहिती दिली. यावेळी स्थायी समिती सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.
५०० एमएलडी पाणी वाचविणे हे गरजेचे आहे. प्रस्तावित गारगाई धरणातून अपेक्षित ४४० एमएलडी पाणीवाढीच्या जवळपास हे प्रमाण आहे. त्यामुळे नवीन जलस्रोत निर्माण करण्याबरोबरच विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेतील नुकसान कमी करण्यावर पालिकेने भर दिला आहे. अनधिकृत पाणी जोडण्या ज्या भागांत नियमित करता येऊ शकतात, त्या नियमित करणे हा पाणी चोरी कमी करण्याचा एक मार्ग असल्याचे अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
जून २०२२ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘सर्वांसाठी पाणी’ उपक्रमांतर्गत पालिकेने २६,७७४ पाणी जोडण्या दिल्या आहेत. त्यामुळे अशा जोडण्यांमधून वापरले जाणारे पाणी एनआरडब्ल्यूमध्ये जाण्याऐवजी पालिकेच्या महसुलात आणणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सना, टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठीही नवे धोरण आणण्याची तयारी सुरू आहे. यानुसार टँकरमधून पालिकेच्या जलवाहिन्यांमधून अनधिकृतरीत्या पाणी उचलले जाणार नाही, तर विहिरींच्या पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी ओटीपीआधारित प्रणाली विकसित करण्यात येत असून, येत्या काही आठवड्यांत हे धोरण स्थायी समितीसमोर मांडले जाईल.
पाण्याचा वापर, पण महसूल नाही
मुंबई महापालिकेचे संचालक पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले की, एनआरडब्ल्यूमधील सर्व पाणी प्रत्यक्षात वाया जातेच असे नाही. त्यातील सुमारे ६ ते ७ टक्के पाणी प्रत्यक्ष गळतीमुळे जाते. मात्र मोठ्या प्रमाणातील पाणीचोरी किंवा सदोष मीटरिंगमुळे पालिकेच्या महसुलाबाहेर राहते. म्हणजेच पाणी वापरले जाते; मात्र त्यातून पालिकेला महसूल मिळत नाही. त्यामुळे ही बाब पालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या धरणातून पाणीपुरवठा!
मुंबईला दररोज सुमारे ४१०० दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यामध्ये भातसा तलावाचा वाटा सर्वाधिक असून तो मुंबईच्या पाण्याच्या गरजेपैकी सुमारे ४८ टक्के पाणी पुरवतो. अप्पर वैतरणा १६ टक्के, मध्य वैतरणा १२ टक्के, मोडकसागर ११ टक्के आणि तानसा १० टक्के पाणी पुरवतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी आणि विहार तलाव मिळून उर्वरित सुमारे २ टक्के पाण्याचा पुरवठा करतात.
बाष्पीभवनामुळे पाण्यात घट!
यंदा उन्हाळी झळा बसू लागल्या असून ऑक्टोबरचा उन्हाळा अधिक तापदायक ठरू शकतो. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात अधिक घट होण्याची शक्यता आहे, असे अभिजीत बांगर यांनी सांगितले.