मुंब्रा अपघात अतिगर्दीमुळे; आरोपी अभियंत्यांचा न्यायालयात दावा संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंब्रा अपघात अतिगर्दीमुळे; आरोपी अभियंत्यांचा न्यायालयात दावा

यंदाच्या जूनमध्ये झालेल्या मुंब्रा रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वेच्या दोन वरिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. हा अपघात आमच्या चुकीमुळे नाही, तर लोकलमधील अतिगर्दीमुळे झाला होता, असा दावा या दोन्ही रेल्वे अभियंत्यांनी न्यायालयात केला आहे.

Swapnil S

ठाणे : यंदाच्या जूनमध्ये झालेल्या मुंब्रा रेल्वे अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी रेल्वेच्या दोन वरिष्ठ अभियंत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. हा अपघात आमच्या चुकीमुळे नाही, तर लोकलमधील अतिगर्दीमुळे झाला होता, असा दावा या दोन्ही रेल्वे अभियंत्यांनी न्यायालयात केला आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. टी. पवार यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली. या दोन अभियंत्यांनी ही भूमिका त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जात मांडली.

न्यायालयाने पोलिसांना या अर्जावर अहवाल सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी ११ नोव्हेंबरला ठेवली आहे.

हा अपघात ९ जून रोजी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान झाला होता. कसारा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या दोन लोकल एका तीव्र वळणावरून एकमेकांना ओलांडत असताना, फुटबोर्डवर उभ्या असलेल्या काही प्रवाशांच्या पाठीवरील बॅगा एकमेकांना धडकल्या आणि ते खाली रेल्वे रुळांवर कोसळले, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.

१ नोव्हेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस, वरिष्ठ विभाग अभियंता समर यादव तसेच इतर रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर, ज्यांच्यावर रेल्वे रुळांच्या देखभालीची जबाबदारी होती त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०५ आणि १२५ (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणे ‘जीआरपी’ने यापूर्वी या घटनेत अपघाती मृत्यूची नोंद केली होती.

डोळस आणि यादव यांच्यावतीने वकील बलदेव राजपूत यांनी न्यायालयात सांगितले की, हा अपघात अर्जदारांच्या दुर्लक्षामुळे नव्हे, तर लोकल गाड्यांमधील अतिगर्दीमुळे झाला.

जर रेल्वेच्या बिघाडामुळे हा अपघात झाला असता, तर त्या ठिकाणी रोज जाणाऱ्या इतर २०० गाड्यांबाबतही अशी दुर्घटना घडली असती. अर्जदार हे सरकारी कर्मचारी असून चौकशीसाठी केव्हाही उपलब्ध आहेत.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याच्या निवेदनाची दखल घेतली आहे, ज्यात अशा प्रकारचे अपघात लोकल गाड्यांतील गर्दीमुळे होत असल्याचे म्हटले आहे.

Navi Mumbai : खारघरमधील भूखंडाला सर्वाधिक बोली; सेंट्रल पार्कलगतचा प्लॉट तब्बल २१०० कोटींना

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

निवडणुकीच्या तोंडावर सरकारला गरीबांची आठवण; 'शिवभोजन थाळी'ची पुन्हा घेता येणार चव; २८ कोटींचा निधी उपलब्ध

मतदार यादीतील घोळ दूर करण्यासाठी कोलंबिया पॅटर्न; आज महाराष्ट्रात येणार कोलंबियाचे पथक

Mumbai : सर्व मेट्रो संस्थांच्या एकत्रीकरणासाठी समिती; ३ महिन्यांत अहवाल शासनास करणार सादर