वसई : नालासोपारा येथील सोपारा गावातील जिल्हा परिषद शाळेत खिचडी बनवत असताना कुकरचा स्फोट होऊन मदतनीस महिलेसह दोन विद्यार्थी भाजले. यामध्ये एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली, तर १० वर्षीय विद्यार्थी गंभीररीत्या भाजला असून त्याच्या चेहऱ्याला मोठी दुखापत झाली आहे.
घटनेनंतर गंभीर जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल न करता पालकांसोबत पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थी व त्याच्या पालकांची भेट घेतली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ऋग्वेद दुधाट यांच्या विनंतीवरून वरिष्ठ डॉक्टर डॉ. बारोट यांनी विद्यार्थ्याची तपासणी केली. पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. आमदार दुबे- पंडित यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्याशी संपर्क साधून उपचारांची संपूर्ण जबाबदारी घेण्याची मागणी केली.