मुंबई

पाचपैकी तीन महिलांची हाडे ठिसूळ ; नानावटी मॅक्स रुग्णालयाचा अहवाल

६१ ते ८० वर्षे वयोगटातील जवळजवळ निम्म्या महिलांमध्ये फेमरल नेकचा ऑस्टियोपेनिया आढळला

प्रतिनिधी

मुंबईतील ४० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांमधील पाचपैकी तीन महिला ऑस्टियोपेनियाने ग्रस्त आहेत. तसेच चौघींपैकी एकीला ऑस्टिओपोरोसिस असल्याचे निदान झाले आहे. हाडांची दुखणी महिलांमध्ये वाढत असून योग्यवेळी वैद्यकीय उपचार न मिळाल्याने ही दुखणी बळावू शकतात, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. १९२१ महिलांची पाहणी केली असता, त्यांतील २७ टक्के महिलांना ऑस्टिओपोरोसिस होता, तर ६४ टक्के महिलांना ऑस्टियोपेनिया स्वरुपाची हाडांची दुखणी होती.

६१ ते ८० वर्षे वयोगटातील जवळजवळ निम्म्या महिलांमध्ये फेमरल नेकचा ऑस्टियोपेनिया आढळला. त्यामुळे कायमचे अपंगत्व अशा समस्या येऊन त्यांच्या जीवनाची गुणवत्ता कमी होते, असे नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आले आहे. ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियोपेनिया या आजारांत हाडांची घनता कमी होत असते. फ्रॅक्चर, तीव्र वेदना आणि हालचाली कमी होण्याचा धोका त्यात वाढू शकतो. ऑस्टियोपोरोसिसमध्ये हाडे कमकुवत आणि ठिसूळ होतात, त्यामुळे ती तुटण्याची शक्यता वाढते. रजोनिवृत्तीपाशी पोचलेल्या आणि रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये या तक्रारी कायम दिसून येतात.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या पाचपैकी एक या प्रमाणात महिलांना कमरेजवळच्या भागात ऑस्टिओपोरोसिस असल्याचे निदान झाले. त्यांच्यात पाठीच्या मणक्यांमध्ये फ्रॅक्चर आणि कुबड निघण्यासारख्या मज्जारज्जूमध्ये दुखण्याचा त्रास बळावतो. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन त्या जमिनीवर पडण्याचा धोका वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात. या आजारामुळे महिलांची हाडे ठिसूळ होतात तसेच त्यांना फ्रॅक्चर होऊ शकते. रुग्णालयामध्ये दाखल करणे, शस्त्रक्रिया आणि दीर्घकालीन अपंगत्व यांना त्यांना तोंड द्यावे लागू शकते. आता झालेल्या संशोधनामुळे आम्हाला भविष्यात ही परिस्थिती टाळण्यात मदत होईल, असे डॉ. गायत्री देशपांडे यांनी नमूद केले.

नियमित तपासणी गरजेची

हाडांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे. या चेक-अप दरम्यान डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, जीवनशैलीचे घटक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यासंदर्भात विचारणा करतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी पूरक आहार, वजन कमी करणारे व्यायाम आणि औषधे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपायांमुळे या आजाराचा काही प्रमाणात प्रतिबंध करता येतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

कारणे, लक्षणे आणि समस्या

* स्टिरॉइड्सचा वापर, दीर्घकाळापासून धूम्रपान आणि मद्यपानाच्या सवयीमुळे हाडे ठिसूळ झाल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले.

* हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि हाडांमधून कॅल्शियमचा ऱ्हास कमी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इस्ट्रोजेनचे प्रमाण रजोनिवृत्तीनंतर लक्षणीयरित्या कमी होते.

* अनेक महिलांना दैनंदिन जीवनात साध्या हालचालींदरम्यान त्रास होत असतो. मात्र त्या शांतपणे ते सहन करतात याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

* पीठ मळणे, दाराचा नॉब फिरवणे, कारचे स्टीयरिंग फिरवणे किंवा चालणेही शक्य न होण्याच्या तक्रारी यामुळे उद्भवतात.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Thane First Metro : ठाणे मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी यशस्वी; कशी आहे ठाणेकरांची पहिली मेट्रो, जाणून घ्या

मुंब्रा बायपासवर भीषण अपघात; कंटेनर ट्रकची दुचाकीला धडक, ३ तरुणांचा मृत्यू

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सुप्रीम कोर्टाचा दणका; २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा नाही

कारचालकाने अचानक ब्रेक दाबला अन्...; मुलुंड टोलनाक्याजवळ अपघात, ८ ते ९ वाहने एकमेकांना आदळली