मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील उघडे मॅनहोल सुरक्षित ठेवण्याची जबादारी ही महापालिकेचीच आहे. ते उघडे ठेवल्याचे खपवून घेतले जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी उघडे मॅनहोल मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घ्या. अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालिकेला खडे बोल सुनावत मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी अंमलात आणणार्या उपयायोजनांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश महापालिकेला दिले.
वांद्रे पश्चिम येथील १६व्या रस्त्यावर ४ मॅनहोल उघडी असल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर या मॅनहोल संदर्भात हायकोर्टने पाच वर्षांपूर्वी २०१८ला दिलेल्या आदेशांची पूर्तता होत नसल्याने अॅड रुजू ठक्कर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय अहुजा आणि न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्यासमोर सुनावणी झाली.
यावेळी न्यायालयाने पालिकेच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली. यापूर्वी या संदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत. याची आठवण खंडपीठने पालिकेला करून दिली. उघडे ठेवल्याचे खपवून घेतले जाणार नाही. पावसाळ्यापूर्वी उघडी मॅनहोल मृत्यूचा सापळा बनणार नाहीत, याची काळजी घ्या, अशा शब्दांत पालिकेला खडे बोल सुनावले. दरम्यान, खंडपीठाने पुढील सुनावणी ८ जून रोजी निश्चित केली.