पालघर : जागतिक मच्छिमार दिनाचे औचित्य साधून वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात पालघरच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा आंदोलनाचा आवाज बुलंद झाला. वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वरोर येथे हजारो मच्छिमार, महिला, भूमिपुत्र आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते एकत्र आले. माकपचे डहाणू-तलासरीचे आमदार विनोद निकोले यांनी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनामुळे या आंदोलनाला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पारंपरिक मासेमारी, सागरी पर्यावरण आणि स्थानिकांच्या अस्तित्वावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत वाढवण बंदर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.
जागतिक मच्छिमार दिनानिमित्त वरोर परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारोंच्या संख्येने महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. वाढवण बंदर प्रकल्पामुळे पारंपरिक मासेमारी क्षेत्र बाधित होण्याची तसेच हजारो मच्छिमार कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती आंदोलकांनी व्यक्त केली. विकासाच्या नावाखाली किनारपट्टीवरील स्थानिकांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
बंदर प्रकल्प मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा देत आगामी काळात हा लढा अधिक व्यापक आणि तीव्र करण्याचा निर्धार वरोर येथील आंदोलनातून व्यक्त करण्यात आला.
राजकीय पक्ष आणि संघटनांचा सहभाग
या आंदोलनात आमदार विनोद निकोले, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी संदेश पाटील, वाढवण बंदर युवा संघर्ष समितीचे अध्यक्ष मिलिंद राऊत, विनीत पाटील, काँग्रेसचे पालघर जिल्ह्यातील सत्यम ठाकूर, एकता परिषदेचे भरत वायडा व वर्षा वायडा, कष्टकरी शेतकरी संघटनेचे बॅन लोबो, मच्छिमार संघटनेच्या महिला कार्यकर्त्या मधुबाई लोबो, संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण तांडेल आणि प्रशांत पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तिवरांच्या पूजनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश
वाढवण बंदर प्रकल्पामुळे तिवरांची यानिमित्ताने किनारपट्टीवरील (खारफुटी) जंगले, सागरी जैवविविधता आणि माशांच्या प्रजनन क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनस्थळी तिवरांच्या झाडांचे विधिवत पूजन करण्यात आले. समुद्र, निसर्ग आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.