मुंबई

सरस्वती देवीचे फोटो हटविणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी

शाळांमधील सरस्वती देवीचे फोटो कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हटविणार नाही. महापुरुषांचे फोटो तर शाळेत लावलेले असतातच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवभोजन थाळी बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही; मात्र त्या योजनेत ज्या तक्रारी आहेत, त्यांची निश्चित चौकशी करून आढावा घेण्यात येईल. आमच्या सरकारने मराठा समाजातील तरुणांसाठी अधिसंख्य पदे तयार करून त्यांच्या नियुक्तीपत्राचे वाटपही केले असल्याची माहितीही त्यांनी दिली. पीएफआय या संघटनेवर केंद्रीय संस्था तसेच एटीएस गेली पाच वर्षे नजर ठेवून होत्या. समाजात दुही माजवून देशाला खिळखिळे करण्याचा या संस्थेचा हेतू होता. त्यांच्यावरच्या कारवाईची माहिती योग्यवेळी तपास यंत्रणा देतीलच, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळांमधील सरस्वती देवीचे चित्र हटवा, असे वक्तव्य केले होते. त्याबाबत विचारले असता, “भुजबळ नेमके काय बोलले हे मी ऐकलेले नाही; मात्र असे जर कोणी म्हटले असेल तर ते चूक आहे. सरस्वती ही विद्येची देवता आहे. कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती, परंपरा मान्य नाहीत. हिंदुत्व मान्य नाही, अशीच व्यक्ती असे बोलू शकतो. महापुरुषांचे फोटो तर लावलेच पाहिजेत. प्रत्येक शाळेत तर ते लावले जातातच; मात्र आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत सरस्वती देवीचे फोटो हटविणार नाही,” असेही फडणवीस म्हणाले.

पोलीस विभागात अधिकची साडेअकरा हजार पदे भरण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. एकूण २० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. भरती प्रक्रिया या वर्षी एकत्रितपणे करण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. उलट आम्हीच महाजन यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्याचा पेनड्राइव्ह देऊन खुलासा केला होता. आमच्यावर खोट्या केसेस टाकून अटक करण्याचे षड‌्यंत्र रचण्यात आले होते. त्याचाच तपास आता सीबीआय करणार आहे, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

पीएफआय या संघटनेवर केंद्रीय तपास यंत्रणा तसेच एटीएसची नजर होती. समाजात दुही माजवून देश खिळखिळा करण्याचे षड‌्यंत्र रचण्यात आले होते. त्यावर आता कारवाई सुरू आहे. तपास यंत्रणा याबाबत योग्य वेळी माहिती देतीलच, असेही फडणवीस म्हणाले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल