मुंबई

चिमुकलीवर बलात्कार करून हत्या; आरोपीची फाशीची शिक्षा केली रद्द

अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या कामगाराला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.

Swapnil S

मुंबई : अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या कामगाराला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावणारा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. जलदगती कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणातील अतिरिक्त पुराव्यांच्या आधारे नव्याने युक्तीवाद ऐकून घ्यावेत, असे निर्देश देत उच्च न्यायालयाने आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि श्याम चांडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

फेब्रुवारी २०२२ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून फाशी सुनावली होती. त्या शिक्षेला आरोपीने आव्हान दिले. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब करून घेण्यासाठी याचिका दाखल केली. दोन्ही याचिकांवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आरोपीची फाशीची शिक्षा रद्द केली. तसेच कनिष्ठ जलदगती न्यायालयाने अतिरिक्त पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद पुन्हा ऐकावेत तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रभावित न होता कायद्याला धरून खटल्याबाबत नव्याने निर्णय द्यावा, असे खंडपीठाने शिक्षेचा निर्णय रद्द करताना नमूद केले. हा फाशीचा खटला असल्याने आरोपीला स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्व संधी मिळाल्या पाहिजेत. खटला सुरू असलेल्या न्यायालयासमोरच अतिरिक्त पुराव्यांबाबत सर्व पैलूंवर युक्तिवाद करण्याची संधी आरोपीला मिळाली पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये पिडीत अल्पवयीन मुलगी घराच्या अंगणात खेळत होती. याचवेळी तिचे अपहरण करण्यात आले. या घटनेचा तपास एका रिक्षाचालकाच्या जबाबावर आधारित होता. त्या रिक्षाचालकाने संबंधित पुरूष आणि मुलीला जवळच्या परिसरात सोडले होते. नंतर ती मुलगी पुलाच्या शेजारी असलेल्या सिमेंट पाईपमध्ये मृतावस्थेत आढळली होती. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी वीटभट्टी कामगाराला अटक केली होती.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास