उपनगरीय रेल्वे मार्ग तसेच मेल-एक्सप्रेसमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांकडून चोख बजावण्यात येते. यासाठी नवनवीन अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात येतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका बजावणारे साधन म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे. कॅमेऱ्यात कैद होत विविध घटनांचा, गुन्हेगारांचा शोध घेतला जातो. मात्र सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रिकरण संकलनाच्या कालावधी मर्यादित म्हणजेच ३० अथवा ६० दिवस एवढाच आहे. परिणामी अनेक गुन्ह्यांचा शोध लांबल्याने बहुतांशवेळा मर्यादित कालावधीमुळे सीसीटीव्हीतील पुरावे नष्ट होतात. यामुळे सीसीटीव्हीत चित्रीकरण संकलन कालावधीत वाढ करण्याची म्हणजेच कालावधी ९० दिवसांचा करण्याची मागणी रिसर्च डिजाईन स्टॅण्डर्ड ऑर्गनायजेशनकडे (आरडीएसओ) लोहमार्ग पोलिसांनी केली आहे.
रेल्वे, मेल-एक्सप्रेसमधून लाखो प्रवाशांची प्रतिदिन वर्दळ सुरु असते. वाढत्या प्रवासी संख्येमुळे विविध दुर्घटना, गुन्हे यामध्ये देखील कमालीची वाढ झाली आहे. मागील दोन वर्षात १५ हजारहून गुन्हे घडल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यांची उकल करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेल्या चित्रणाची सर्वाधिक मदत लोहमार्ग पोलिसांना होते. सीसीटीव्हीत कैद झालेल्या चित्रात संबंधित गुन्हेगाराचा फोटो, त्याच्या हालचाली, वेळ, दिनांक सर्वात महत्त्वाचा म्हणजे चेह्राओळख पटण्यात सर्वाधिक मदत होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण पुरावा म्हणून सादर करण्यात येते. परंतु रेल्वे स्थानकात विविध मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण मिळवून तपास करण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे काही कालावधीसाठी हे चित्रण उपलब्ध होणे गरजेचे असते. मात्र काही प्रकरणांमध्ये तसे होत नाही. सध्या सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रण ६० दिवस संकलित करून ठेवता येते. तर काही सीसीटीव्हीचा चित्रण संकलन कालावधी ३० दिवस आहे. त्यानंतर हे संकलन आपोआप यंत्रणेतून रद्द होते. परिणामी एखाद्या गुन्ह्याचे चित्रण पुन्हा मिळवताना बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे मेल-एक्स्प्रेस टर्मिनसवरील सीसी टीव्हीतील चित्रण संकलनाचा कालावधी ९० दिवस करावा अशी मागणी लोहमार्ग पोलिसांकडून कारण्यात येत आहे.
सीसीटीव्ही हे तपास मोहिमेतील महत्त्वाचे अस्त्र आहे. मात्र मर्यादित कालावधीमुळे बहुतेक कारवाईवेळी सीसीटीव्ही फुटेज जोडणे अवघड ठरते. यामुळे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलन कालावधीत वाढ केली तर गुन्हेगारांचा माग काढणे सोपे होईल.
- कैसर खालिद, आयुक्त, लोहमार्ग पोलीस