मुंबई : प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना मतदारांच्या घरी जाऊन भेटण्याची परवानगी देण्याबद्दल तसेच ईव्हीएमला जोडल्या जाणाऱ्या नव्या ‘पाडू’ मशीनची कल्पना न दिल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी राज्य निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले.
मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्याची मुभा लोकसभा व विधानसभेला का देण्यात आली नव्हती? ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या ‘पाडू’ मशीनबद्दल आम्हाला साशंकता आहे. आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता ही मशीन ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयोग सरकारला मदत करत असल्याचे स्पष्ट होते, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.
राज आणि उद्धव यांनी मतदानाच्या एक दिवसआधी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. राज म्हणाले की, “ईव्हीएम मशीनला जोडल्या जाणाऱ्या प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (पाडू) मशीनची कोणत्याही राजकीय पक्षाला कल्पना दिली नाही. तसेच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे हे सरकारधार्जिणे निर्णय घेत असून त्यांच्यातील वाघ सरकारने कधीच मारून टाकला आहे. ते मशीन आम्हाला दाखवले गेलेले नाही. उद्धव ठाकरेंच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला याबद्दल पत्र लिहिले आहे. हे मशीन राजकीय पक्षांना का दाखवले गेले नाही, हे मशीन काय आहे? राजकीय पक्षांना याची माहिती द्यावीशीही त्यांना वाटत नाही. निवडणूक आयुक्त वाघमारे यावर उत्तर द्यायला तयार नाहीत.”
“मंगळवारी ५ वाजता प्रचार थांबला. आजपर्यंत निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्यानंतरच्या दिवशी मतदान, अशी प्रथा होती. पण या सरकारला जे हवंय? यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे का? याची शंका येते. काल निवडणूक आयोगाने पत्रक काढले की, मतदानाच्या आदल्या दिवशी ५ वाजेपर्यंत तुम्ही मतदारांना भेटू शकता. ही प्रथा कशी आणि कुठून आली? ही प्रथा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला का नव्हती, ती आजच का आली? उमेदवार मतदारांना जाऊन भेटू शकतात, पण पत्रके वाटू शकत नाही. म्हणजे उमेदवारांनी पैसे वाटायचे का? मुळात ही मुभा का दिली?” असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले.
‘पाडू’ मशीन म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमच्या नियंत्रण युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणी दर्शविण्यासाठी मतमोजणीदरम्यान ‘प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट’ (पाडू) वापरले जाणार आहे. मतमोजणी प्रक्रियेत व्यत्यय येऊ नये म्हणून हे मशीन केवळ आकस्मिक उपाय म्हणून काम करेल. ‘पाडू’ मशीनद्वारे मतदान यंत्रातील डेटा वाचता येऊ शकतो. प्रथमच ही यंत्रणा वापरण्यात येणार असून अशा १४० यंत्रांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ‘मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’, बेंगलुरू या कंपनीची मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. या मतदान यंत्रांद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर याच कंपनीने विकसित केलेल्या ‘पाडू’चा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येते, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. हरलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला मदत करत आहे. ईव्हीएम बंद पडले, तर हे मशीन वापरले जाणार आहे. ईव्हीएमला नवे मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही? यात गडबड होणार नाही हे कशावरून? ही कुठली बेबंदशाही सुरू आहे? ही कसली लोकशाही? काय प्रकारचे राजकारण सुरू आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. मनसे, शिवसेना आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सतर्क आणि सावधान राहावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
ही ठाकरे बंधूंची पराभवाची तयारी - बावनकुळे
केंद्र किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणतेही पेपर किंवा जाहिरात न करता आपल्याला मतदारांच्या घरी जाता येते. आम्हालाही चार घरी भेटी देता येतात. समाजातील प्रतिष्ठित लोकांना भेटावेच लागते. शेवटी मतदान कुणाला करायचे ते लोक करतील. पण भेट घेणे हे नियमातच आहे. ठाकरे बंधूंना आपल्या पराभवाची चाहूल लागली असून, त्यातून ते अशी विधाने करत आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठी घेणे हे नियमांनुसारच आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंचा समाचार घेतला.