मुंबई

केंद्रीय मंत्र्यांचा 'बॉम्बे' उच्चार; राज ठाकरेंकडून कानउघडणी, म्हणाले, 'मुंबई' नाव खटकतं कारण...

खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.

किशोरी घायवट-उबाळे

सध्या राज्यात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. मुंबईत मराठी बोलण्यावरून अनेक वाद निर्माण होत आहेत. अशातच, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी 'मुंबई' शब्दावरून वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची कानउघडणी केली. "त्यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या नावावरून आहे", असे म्हणत राज ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांचा समाचार घेतला.

पोटात साचलेली मळमळ...

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सोमवारी (दि.२४) 'आयआयटी मुंबई'च्या कार्यक्रमात "आयआयटी बॉम्बेचं नाव बदलून मुंबई केलं नाही, याचा आनंद आहे" असे म्हटले. यावर निशाणा साधत राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले, की, "जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय. आणि ही मानसिकता काय आहे? तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच , तिला महाराष्ट्रापासून पासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला. आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली. त्याबद्दलची गेली अनेक दशकं यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे!"

तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय

पुढे मराठी माणसांना उद्देशून राज ठाकरे म्हणाले, "खरंतर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी, ना गुजरातशी. ते येतात जम्मूमधून.. पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललं आहे ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. या निमित्ताने फक्त मुंबई नाही तर आता एमएमआर परिसरात राहणाऱ्या तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे की, आता तरी डोळे उघडा. यांना 'मुंबई' हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबा आईच्या म्हणजे मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलं आहे. त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं. तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय."

मराठी माणसा जागा हो...

राज ठाकरे म्हणाले की, "आज केंद्र सरकारने तिकडे चंदिगढ शहर पंजाबच्या हातातून काढून घ्यायचा प्रयत्न केला. त्याला सर्वपक्षीय विरोध झाला म्हणून त्यांनी माघार घेतली, पण ती तात्कालिक माघार आहे. असाच काहीतरी डाव मुंबईच्या बाबतीत १००% शिजत असणार. 'मुंबई' नको 'बॉंबे'च हवं यातून हळूच हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न नक्की सुरु आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण एमएमआर परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे! तेंव्हा मराठी माणसा जागा हो. इथे आधीच केंद्रीय हस्तक उद्योगपती इत्यादींनी काय काय ताब्यात घ्यायला सुरु केलं आहे हे आपण रोज पाहतो आहोतच! आतातरी मराठी माणसांना हे कळायला हवं!" असे म्हणत राज ठाकरेंनी मराठी नागरिकांना सजग राहण्याचा सल्ला दिला.

Mumbai : कृत्रिम फुलांना पसंतीची मोहोर; चिनी बनावटीच्या फुलांना पसंती, क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड

Mumbai : विद्यार्थ्यांनी घडवल्या पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती; ‘फ्री प्रेस हाऊस’मध्ये भरला नवकलाकारांचा मेळा

Mumbai : ब्रीच कँडीकरांचा ‘बीएमसी फुटपाथ रिपोर्ट कार्ड’; ‘कारवाईची नोंद व जबाबदारी निश्चित करा, रहिवाशांची मागणी

BRICS Summit 2026 : ‘ब्रिक्स’ साठी जिनपिंग दिल्लीत येणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र