मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाविरोधात (SIR) विरोधात ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईत जनमोर्चा काढण्याची शनिवारी (दि. २६) घोषणा केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) पुढाकाराने हा मोर्चा काढण्यात येणार असून, एसआयआरच्या मुद्द्यावरून सर्व राजकीय पक्षांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे केले आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी सांगितले की, हा मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणार आहे. मात्र, मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेबाबतच्या चिंता मांडण्यासाठी हे जनआंदोलन असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. एसआयआर प्रक्रियेचा वापर निवडणूक प्रक्रिया कमकुवत करण्यासाठी केला जात असल्याचा आरोप पोस्टमध्ये केला असून, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे.
राज ठाकरेंची पोस्ट जशीच्या तशी -
सस्नेह जय महाराष्ट्र,
देशातील सत्ताधारी पक्षाची जणू काही आपण शाखाच आहोत अशा पद्धतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने 'एसआयआर'च्या नावाखाली मतदारांची जी घोर फसवणूक केली आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना येत्या ४ ऑक्टोबर २०२६ ला मुंबईत एक जनमोर्चा काढणार आहे. या मोर्चाच्या आयोजनात जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा पुढाकार असला तरी हा जनतेचा मोर्चा आहे आणि हा एका पक्षापुरता न राहता तो तमाम राजकीय व्यवस्थेचा आणि जनतेचा आवाज ठरेल यासाठी आम्ही सर्व राजकीय पक्षांना या मोर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी संवाद साधणार आहोत.
अर्थात महाराष्ट्रातील जनतेलाच आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्च्यात सहभागी व्हा. बाकी मोर्च्याची वेळ आणि ठिकाण लवकरच कळवण्यात येईल. तेंव्हा एसआयआरविरोधातील या जन मोर्च्यात भेटूया! या, देशातील लोकशाही आणि या देशाचे संविधान वाचवण्यासाठी एकत्र या!
राज ठाकरे - उद्धव ठाकरे
'एसआयआर'विरोधातील या जनमोर्चाची वेळ आणि ठिकाण मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंनी 'एसआयआर'विरोधात घेतलेल्या या भूमिकेवर सत्ताधारी महायुतीतील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, तसेच इतर राजकीय पक्ष या जनमोर्चात सहभागी होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)