मुंबई : निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची आई मनोरमा खेडकर यांचा पिस्तुल परवाना रद्द करण्याबाबत पुणे पोलीस आयुक्तांचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. परवाना रद्द करण्याआधी त्याबाबतची रितसर कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी केली नसल्याचे नमूद करून या आदेशावर पुनर्विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेतलेला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. धांदवली गावातील एका शेतावर जमिनीच्या वादावरून काही लोकांना खेडकर या पिस्तुल दाखवित असल्याचे व्हिडीओत दिसत होते. याची दखल घेत पुणे पोलीस आयुक्तांनी खेडकर यांना पिस्तुल परवाना रद्द करत असल्याची नोटीस पाठविली होती. त्याला खेडकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपली बाजू मांडण्याची संधी न देताच पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप खेडकर यांनी याचिकेत केला.