मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या बृहत्सूची (मास्टर लिस्ट) लॉटरीतील पात्र मूळ भाडेकरू/रहिवाशी लाभार्थ्यांच्या निकटच्या वारसांना सदनिकेचा सशर्त ताबा देण्याचा महत्त्वाचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी म्हाडा मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यामुळे पात्र भाडेकरूंच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे २८ डिसेंबर २०२३ रोजी बृहत्सूचीवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतींतील २६५ पात्र भाडेकरू-रहिवाशांना सदनिका वाटप करण्यासाठी संगणकीय लॉटरी काढण्यात आली. परंतु भाडेकरू/रहिवाशी यांना सदनिकेचे वितरण करण्यासाठी देकार पत्र वितरीत करण्यात आल्यानंतर, अनेक प्रकरणांमध्ये मूळ भाडेकरू किंवा रहिवाशांचे निधन झाले असल्याचे आढळून आले. अशा प्रकरणांमध्ये मूळ भाडेकरू/रहिवाशी यांची पत्नी/मुले असे एकापेक्षा जास्त वारस असल्यामुळे सक्षम न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वारसांना सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो, ज्यामुळे घराचे वितरण करण्यास विलंब होत आहे.