मुंबई

Mumbai : 'मोदी, मोदी' विरुद्ध 'ठाकरे, ठाकरे'च्या घोषणाबाजीत रितू तावडे ७७व्या महापौर, शिंदेसेनेचे संजय घाडी उपमहापौर

तब्बल चार वर्षांनंतर आज (दि.११) मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आणि 'लोक प्रतिनिधी राज्य' सुरू झाले. मुंबईच्या ७७ व्या महापौर म्हणून भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक संजय घाडी यांची...

Krantee V. Kale

तब्बल चार वर्षांनंतर आज (दि.११) मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आणि 'लोक प्रतिनिधी राज्य' सुरू झाले. मुंबईच्या ७७ व्या महापौर म्हणून भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची तर उपमहापौरपदी शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक संजय घाडी यांची नियुक्ती झाली. मुंबई महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. दोघांनीही निवडीनंतर तत्काळ पदभार स्वीकारला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली.

‘मोदी, मोदी’ विरुद्ध ‘ठाकरे, ठाकरे’

दरम्यान, महापौर निवडणुकीदरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी दुपारी मोठी घोषणाबाजी झाली. रितू तावडे यांची महापौरपदी निवड जाहीर होताच भाजप नगरसेवकांनी “मोदी, मोदी” आणि “देवा भाऊ”च्या घोषणा दिल्या. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नगरसेवकांनीही प्रत्युत्तर म्हणून “ठाकरे, ठाकरे” अशी घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले. याशिवाय, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पीठासीन अधिकारी भूषण गगराणी यांच्या नावावर आक्षेप घेतला होता. तथापि, हा आक्षेप गगराणी यांनी सरकारच्या आदेशांनुसार फेटाळून लावला. त्यावरूनही सभागृहात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. याशिवाय, घाडी भाषणासाठी उभे राहताच ठाकरेंच्या नगरसेवकांनी, '५० खोके, एकदम ओके' अशी घोषणाबाजीही केली.

तीन दशकांनंतर पहिल्यांदाच असं घडलं

सुमारे तीन दशकांनंतर भाजपचा महापौर मुंबईला लाभला आहे. याआधी १९८२-८३ मध्ये डॉ. प्रभाकर पै यांनी भाजपकडून महापौरपद भूषवले होते. रितू तावडे या भाजपच्या दुसऱ्या आणि पक्षाकडून निवड झालेल्या पहिल्या महिला महापौर ठरल्या आहेत. तीन दशकांनंतर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रथमच विरोधी बाकांवर बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेतील हा मोठा राजकीय बदल मानला जात आहे.

कोण आहेत रितू तावडे?

घाटकोपर येथील प्रभाग १३२ मधून दोन वेळा निवडून आलेल्या तावडे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिले आहे. त्यांचा नागरी समस्यांबाबत चांगला अभ्यास आहे. त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती, मात्र २०१२ मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या आणि तेव्हापासून पक्षाच्या प्रमुख मराठी चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आदी नेत्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. त्याआधी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय असलेल्या फोर्ट परिसरात तसेच बाहेरील रस्त्यांवर भगवे झेंडे लावून भाजपने शक्तीप्रदर्शन केले. दुसरीकडे, काँग्रेसच्या २४ नगरसेवकांनी मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावर निषेध नोंदवण्यासाठी मास्क परिधान करून सभागृहात प्रवेश केला होता.

BMC मधील सध्याचे समीकरण

अलीकडील महापालिका निवडणुकीत भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना (शिंदे गट)ने २९ जागा जिंकल्या. महायुतीकडे एकूण ११८ नगरसेवकांचे बहुमत असून ते बहुमताच्या ११४ च्या आकड्यापेक्षा अधिक आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट)ला ६५, काँग्रेसला २४, एमआयएमला ८, मनसेला ६ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला १, अजित पवार गटाला ३, समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या असून दोन अपक्ष निवडून आले आहेत.

केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम्' अनिवार्य, काय आहेत नवे नियम?

नवीन ॲपमुळे UPI द्वारे EPF चे पैसे काढता येणार; कामगार मंत्रालयाचा प्रकल्प

Mumbai : आजपासून प्रशासकीय राजवट संपुष्टात! महापौर, उपमहापौर सूत्रे हाती घेणार; सभागृह, सभागृहाबाहेर सजावट, रंगरंगोटी

२३ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; राज्याचा अर्थसंकल्प ६ मार्चला होणार सादर

फडणवीसांची दिल्लीत अमित शहांशी गुप्त बैठक; आज सुनेत्रा पवार घेणार मोदी-शहांची भेट