मुंबई : प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम) येथे दुचाकी वाहनांच्या नोंदणी मालिकेत बदल करण्यात आला आहे. एमएचओ-२-जीक्यू ही चालू मालिका संपुष्टात येत आहे. नवीन एमएचओ जीआर मालिका लवकरच सुरू होणार असून आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आरटीओकडून जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५४-अ अन्वये व ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार आकर्षक क्रमांक राखून ठेवण्यात आले आहेत. या क्रमांकांसाठी निश्चित शुल्क आकारले जाणार असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया अशी असणार आहे. एमएचओ-२-जीक्यू मालिका १ डिसेंबर २०२५ रोजी संपल्यानंतर आकर्षक क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. निर्धारित नमुन्यातील अर्ज आरटीओ मुंबई (पश्चिम) कार्यालयातील आवक-जावक विभागात (तळ मजला, खिडकी क्रमांक १२) रोज सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत जमा करणे बंधनकारक असेल.
डिमांड ड्राफ्ट, पॅनकार्ड आवश्यक
अर्जासोबत अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा (आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी) यांची स्व-साक्षांकित छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी लागणारे शुल्क राष्ट्रीयकृत बँकेच्या डिमांड ड्राफ्टद्वारे आरटीओ मुंबई वेस्ट या नावे सादर करणे बंधनकारक असून पॅन कार्डची प्रतही जोडावी लागेल.
जास्त अर्ज आले, तर लिलाव करणार
एका क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास त्या क्रमांकांची यादी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित केली जाईल. अशा क्रमांकांसाठी लिलाव पद्धत राबविली जाणार आहे. आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी शासनाने ठरवलेल्या शुल्काची माहिती आरटीओ मुंबई (पश्चिम) कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्धापत्रकाद्वारे कळवले आहे.