मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात सामील झालेल्या सचिन अहिर यांची आज एकमताने निवड झाली. ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्याने अहिर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या निवडीनंतर अभिनंदन प्रस्तावावर चर्चा करतेवेळी दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये चांगलीच राजकीय टोलेबाजी रंगली.
ठाकरे गटाला धक्का देत आमदार सचिन अहिर यांनी उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परिषदेत महायुतीचे संख्याबळ अधिक असल्याने अहिर यांचा विजय निश्चित मानला जात होता.
निवडणुकीवेळी संसदीय परंपरा जपत विरोधकांनी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याला प्रतिसाद देत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी अभ्यंकर यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपसभापती पदी सचिन अहिर बिनविरोध झाली.
उपसभापती सचिन अहिर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना दोन्ही शिवसेना नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक टोलेबाजी झाली. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मी दीड वर्ष सभापती आणि उपसभापती म्हणून काम करताना माझ्यावर विशेषतः अनिल परब यांनी मोठी टीका केली. पण आज त्यांनी ती केली नाही. 'मातोश्री'चे समाधान करणे सोपं नसतं, असं मी एकदा बोलले होते तेव्हा मोठा गोंधळ झाला होता. सभागृहात उजवीकडे बघायचे की डावीकडे, असा प्रश्न असायचा. पण उद्धवजी आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र असताना मी समोर बघून कोणावरही अन्याय होऊ दिला नाही," असा टोला त्यांनी लगावला.
सभागृहातील दूत म्हणून त्यांनी मिलिंद नार्वेकर याना शुभेच्छा दिल्या. तसेच सचिन अहिर यांच्या निवडीच्या एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे आपल्याला क्षणभर आश्चर्य वाटले तरी तो निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरा सचिन सज्ज: एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या तुलना थेट क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरशी केली. प्रत्येकाला आपल्या टीममध्ये 'ऑलराउंडर' खेळाडू हवा असतो. एक सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तर हा दुसरा सचिन आता पॅड घालून नवीन इनिंग खेळण्यासाठी मैदानात उतरला असून सभागृह गाजविण्यास सज्ज आहे, असे शिंदे म्हणाले. त्यांनी "तुफान में जो शांत रहे उसे समंदर कहते हैं, जो सबके दिल पर राज करे उसे सिकंदर कहते हैं" हा शेर म्हणत अहिर यांच्या संयमी स्वभावाचे कौतुक केले.
विरोधी पक्षनेता कुठंय?
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आपल्या भाषणात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी सोडली नाही. "उपसभापतींच्या निवडीवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत, पण विरोधी पक्षनेत्याची उणीव भासत आहे. जसा उपसभापतीपदाचा निर्णय तातडीने घेतला, तसा विरोधी पक्षनेत्याचा विचारही तातडीने व्हावा," अशी मागणी त्यांनी केली. तसेच, सचिन अहिर नावाच्या बुलडोझरने अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला असा थेट टोला त्यांनी नीलम गोऱ्हे यांचे नाव न घेता लगावला.
'योग्य वेळी योग्य निर्णय'
सचिन अहिर यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाचा गौरव केला. ते म्हणाले, राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि सचिन अहिर हे त्यात पारंगत आहेत. १९९९ मध्ये आम्ही दोघे एकाच वेळी प्रथमच आमदार म्हणून निवडून आलो होतो. 'अहिर' या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे, त्यांच्या कामातही ती निर्भीडता दिसून आली आहे.