अभिनेता सलमान खान याने मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेऊन स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी केली. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या धमकीच्या पत्रानंतर सलमान खानने ही मागणी केली आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात एक पत्र सापडले असून त्यात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा उल्लेख आहे. या पत्रात सलमान खानला तुझा सिद्धू मुसेवाला करू, अशी धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या पत्रानंतर खबरदारी म्हणून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. या धमकीनंतर सलमान खानने आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. याबाबत सलमानने अर्ज देखील दिला आहे.
गेल्या महिन्यात मिळालेल्या धमकीवर सलमान खानने प्रतिक्रिया दिली होती. "मला हे पत्र मिळालेले नाही. माझ्या वडिलांना त्यांच्या मॉर्निंग वॉक दरम्यान हे पत्र मिळाले. आजकाल माझे कोणाशीही वैर नाही. मला कोणावरही संशय घेण्याचे कारण नाही. तसेच अलीकडे माझा कोणाशीही वाद झालेला नाही. कोणताही धमकीचा कॉल किंवा मेसेज आलेला नाही, असे सलमानने पोलिसांना सांगितले होते.
दरम्यान, सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर वांद्रे पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान खानला धमकावण्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचा संशय महाराष्ट्राच्या गृह विभागाला होता.