मुंबई : बोरिवली मागाठाणे येथील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय घाडी व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका संजना घाडी यांनी रविवारी शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या मुक्त गिरी या शासकीय निवासस्थानी या पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, राजुल पटेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी घाडी दाम्पत्याचे पक्षात स्वागत केले.
गेल्या अडीच वर्षांत सर्वसामान्यांना सोन्याचे दिवस आणण्याचे काम महायुती सरकारने केले आणि ते पुढे सुरू ही आहे. विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख योजना या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिव पदाची जबाबदारी सुधीर साळवी यांच्यावर सोपवली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने रविवारी महत्वपूर्ण घोषणा केली. पूर्वाश्रमीचे शिवसैनिक म्हणून ओळखले जाणाऱ्या नाना अंबोले यांना शिंदे यांनी शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश दिला असून नाना अंबोले यांची वरळी आणि शिवडी विधानसभा समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. तर संजना घाडी यांची शिवसेनेच्या उपनेते आणि प्रवक्ते पदी नियुक्ती केली आहे.
मागाठाण्यात ३५ सदस्यांचे राजीनामे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागाठाण्यात अनेक फेरबदल केले. पक्षातील या फेरबदलाविरोधात पक्षांतर्गत प्रचंड नाराजी उफाळली आहे. पक्षाने जाहीर केलेल्या या नियुक्तांच्या विरोधात मागाठाण्यात सामूहिक राजीनामे देण्यात आले आहे. विभागप्रमुख उदेश पाटेकर यांच्याकडे हे राजीनामे सोपविण्यात आले असून जवळपास ३५ सदस्यांनी आपले राजीनामे पाटेकर यांच्याकडे सोपविल्याचे कळते.