मुंबई : विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवले. संध्या पाठक असे तिचे नाव आहे. गुरुवारी सकाळी संध्याचा मृतदेह आढळून आल्यावर साठ्ये कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झालेला असू शकतो, अशी शक्यता संध्या पाठकच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
संध्या पाठक ही साठ्ये कॉलेजमध्ये ‘स्टॅटिस्टिक्स’ विभागात तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. संध्या नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कॉलेजला आली होती. सीसीटीव्ही’मध्ये संध्या कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोअरमधून चालत जाताना दिसत आहे. तिने अचानक कॉलेज इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तिला तातडीने बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
या घटनेनंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये खळबळ उडाली. कॉलेज प्रशासनाकडून याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. आपल्या मुलीला कुणीतरी ढकलले असावे, असा संशय संध्याच्या पालकांनी व्यक्त केला आहे. तिने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे? याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून संध्या पाठकने खरेच आत्महत्या केली की तिच्यासोबत इतर काही प्रकार घडला? याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.