आमच्यापुढेच राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा! अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा संग्रहित छायाचित्र
मुंबई

आमच्यापुढेच राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याची चर्चा! अभिनेते सयाजी शिंदे यांचा दावा

अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्यापुढेच झाली होती, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत हे अजित पवारांचे स्वप्न होते...

Swapnil S

मुंबई : अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा आमच्यापुढेच झाली होती, असा दावा करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र यावेत हे अजित पवारांचे स्वप्न होते. आमच्यापुढेच एकत्र येण्याची चर्चा झाली होती, असे त्यांनी सांगितले.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी रविवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनी सर्वधर्म समभाव व गरीब - श्रीमंत भेदभाव न करता सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचे ठरवले होते. त्यामुळे मला असे वाटते की, त्यांचे हे स्वप्न आपण सगळ्यांनी विशेषत: सुनेत्रा वहिनी, सुप्रियाताई व पवारांनी पुढे न्यायला पाहिजे. दोन्ही गट एकत्र यावेत हे दादांचे स्वप्न होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण व्हावे अशी आमची इच्छा आहे. असे झाले तरच महाराष्ट्राची ताकद वाढेल, असे त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबांनी ताबडतोब एकत्र आले पाहिजे. त्यांचे काही कौटुंबिक इगो असतील किंवा त्यांच्या काही भावना असतील तर त्या त्यांनी बाजूला ठेवल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे उलटसुलट दावे

अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू असलेली विलीनीकरणाची चर्चा थंडावली. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार विलीनीकरणासाठी आग्रही होते, असा दावा केला, तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा सुरू नव्हती, असे सांगत त्यांचा दावा फेटाळून लावला. यामुळे विलीनीकरणाची चर्चा थंड बस्त्यात पडली. पण आता राजकारणात सक्रिय नसलेल्या सयाजी शिंदे यांनीच विलीनीकरणाची चर्चा माझ्यापुढेच झाली होती, असा दावा केल्याने दोन्ही राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Weather : पावसाचा तडाखा वाढणार; "समुद्रकिनारे, धबधब्यांपासून दूर राहा," मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे नागरिकांना आवाहन

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला; रेल्वे मार्गावरील काम सुरू, नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

Mumbai Rain : मुंबईसाठी रेड अलर्ट! ताशी ९० किमी वेगाने वादळी वारे; अतिवृष्टीचा इशारा, १५ हजार कर्मचारी तैनात

Mumbai Rain : मुसळधार पावसाचा धोका वाढला; खासगी कंपन्यांसाठी 'वर्क फ्रॉम होम'च्या सूचना, सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे

Mumbai Rain : मुंबईच्या डबेवाल्यांनाही मुसळधार पावसाचा फटका; आज सेवा बंद