मुंबई

मृतदेहाच्या गुप्तांगावरील विनोद भोवला! KEM ची डॉक्टर तरुणी अडचणीत; ३७० बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेच्या शोतील आणखी एक क्लिप व्हायरल

प्रणित मोरेच्या शोमधील व्हायरल क्लिपमुळे सेजल पवार वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मृतदेहाच्या गुप्तांगांबाबतच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून याप्रकरणी सेजल पवारने माफी मागितली आहे.

Mayuri Gawade

कॉमेडियन प्रणित मोरे याच्या स्टँड-अप शोमधील ३७० रुपयांच्या बिर्याणीवरील वाद अद्याप शांत झालेला नसतानाच, त्याच शोमधील आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे सेजल पवार. स्वतःला अंतिम वर्षाची एमबीबीएस विद्यार्थिनी म्हणून ओळख करून देणाऱ्या सेजलने शोदरम्यान शवविच्छेदन प्रशिक्षणाबाबत केलेल्या काही वक्तव्यांवरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून, या प्रकरणात KEM रुग्णालयाशी संबंधित डॉक्टर संघटनेनेही भूमिका स्पष्ट केली आहे.

मृतदेहाच्या गुप्तांगांबाबतच्या वक्तव्याने वाद

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये सेजल पवार मेडिकल कॉलेजमधील डिसेक्शन रूममधील अनुभव सांगताना दिसते. संवादादरम्यान तिने काही विद्यार्थी मृतदेहांच्या गुप्तांगांच्या आकारावरून विनोद किंवा टिप्पणी करत असल्याचा उल्लेख केला. शरीरदान केलेल्या मृतदेहांबाबत अशा प्रकारे बोलल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला असून, याच वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.

वैद्यकीय शिक्षणासाठी शरीरदान करणाऱ्या व्यक्तींबद्दल अत्यंत आदर आणि संवेदनशीलतेने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे अनेकांनी म्हटले. काही डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि सामाजिक माध्यमांवरील वापरकर्त्यांनीही या वक्तव्याचा निषेध केला.

KEM MARD ची भूमिका स्पष्ट

वाद वाढल्यानंतर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) च्या KEM शाखेने अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात सेजल पवार ही संघटनेची सदस्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

त्याचबरोबर व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी वक्तव्ये वैद्यकीय व्यवसायाच्या प्रतिष्ठेला आणि नैतिक मूल्यांना साजेशी नसल्याचेही संघटनेने नमूद केले. डॉक्टर म्हणून अपेक्षित असलेल्या संवेदनशीलतेशी ही वक्तव्ये विसंगत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात आला. शरीरदान करणाऱ्या व्यक्तींमुळेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण घेता येते. त्यामुळे अशा व्यक्तींबाबत अनादर दर्शवणारी भाषा वापरणे चुकीचे असल्याची भूमिका अनेकांनी मांडली.

सेजल पवारची माफी

वाद वाढताच सेजल पवारने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून माफी मागितली. व्हायरल होत असलेली क्लिप पुन्हा पाहिल्यानंतर लोक का नाराज झाले आहेत, हे आता समजल्याचे तिने म्हटले.

हा अत्यंत संवेदनशील विषय असून आपण ज्या पद्धतीने बोललो, तसे बोलायला नको होते, अशी कबुलीही तिने दिली. आपल्या वक्तव्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारत कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नव्हता, असे तिने स्पष्ट केले. मात्र आपल्या बोलण्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भविष्यात अशा विषयांवर अधिक जबाबदारीने बोलण्याचे आश्वासन दिले.

इन्स्टाग्राम अकाउंटही गायब?

सेजल पवारचे इन्स्टाग्राम अकाउंटही उपलब्ध नाही.

वाद वाढत असताना सेजल पवारचे इन्स्टाग्राम अकाउंटही उपलब्ध नसल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. सोशल मीडियावर तिचे अकाउंट डिलीट किंवा डीॲक्टिव्हेट करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

प्रणित मोरेच्या शोभोवती वादांचे सावट

अलिकडेच प्रणित मोरेच्या शोमध्ये आलेल्या हिमांशू जांग्रा याच्या ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’वरील वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्या प्रकरणात महिलांविषयीच्या दृष्टिकोनावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता सेजल पवारची क्लिप समोर आल्यानंतर पुन्हा एकदा प्रणित मोरेच्या शोमधील प्रेक्षक संवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वादांवर चर्चा सुरू झाली आहे.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार