मुंबई : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग-अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकातील मजकुरावरून सुरू झालेल्या वादात आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडले गेल्याच्या नव्या वादाची भर पडली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल सदर पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रवक्त्यांकडून बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पुस्तकाचा निषेध केला गेला. यावेळी पुस्तकाची पाने आणि काही छायाचित्रे फाडण्यात आली. मात्र, या निषेध आंदोलनादरम्यान प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप झाल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
पत्रकार परिषदेत शायना एन.सी. या सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील मजकुराचा निषेध करताना पुस्तकातील पाने आणि छायाचित्रे फाडत होत्या. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेले छायाचित्र फाडले गेल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शायना यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर विरोधकांनी शिंदेंच्या शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा विषय बाजूला पडून बाळासाहेबांच्या छायाचित्राचा मुद्दा चर्चेत आला.
शायना यांनी आरोप फेटाळला
दरम्यान, शायना एन.सी. यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा नव्हे, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. एकदा नव्हे, तर दहा वेळा मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडू,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आमची पत्रकार परिषद नीट ऐका आणि पाहा. विरोधकांकडून चुकीचा नॅरेटिव्ह पसरवला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
शायनांना सुनावले खडेबोल
या प्रकारामुळे शिवसेनेची राजकीय कोंडी सुरू झाली असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शायना एन.सी. यांना तातडीने विधानभवनात बोलावून घेऊन त्यांना खडेबोल सुनावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या पुस्तकावरील निषेध आंदोलनाला आता नवे वळण लागले आहे.
'बाळासाहेबांच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिंदे यांनी या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून संबंधितांवर कारवाई करावी'अनिल परब, नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
सोनिया गांधींच्या पुस्तकात 'सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. शायना एन. सी. यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडला नाही तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला आहे. याबाबत जे बोलत आहेत ते सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात’.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री