एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक आठवडा उलटत नाही तोच शिंदे सरकार बंडखोर, भाजप, अपक्ष आमदारांवर मेहेरबान झाले आहे. शिवसेनेचे ४० बंडखोर, त्यांना पाठिंबा देणारे अपक्ष आमदार तसेच भाजप आमदारांसहित शिवसेनेच्या १४ खासदारांसाठी शिंदे सरकारने १५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातआपल्याला निधी मिळाला नसल्याची तक्रार करणाऱ्या आमदारांना तसेच खासदारांना खूश करण्यासाठी शिंदे सरकारने पहिलाच मोठा निर्णय घेतला आहे. नवे सरकार स्थापन झाल्यावर दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनादरम्यान प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघात विकासकामांकरिता ५ ते १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे शिंदे गटातील अनेक आमदारांकडून तसेच भाजपच्या आमदारांकडून सांगण्यात आले. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आपल्याला अधिक निधी मिळवून देतील.