मुंबई : शिवसेनेच्या स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष पूर्ण होत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शिवसेनेच्या दोन्ही गटांतर्फे वर्धापनदिनानिमित्त मेळाव्याचे आयोजन केले आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाचा मेळावा स्वतंत्र होणार आहे. पक्षात घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मेळाव्यात कोणती भूमिका मांडणार आणि त्याला शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणते प्रत्युत्तर देणार याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षातच शिवेसेनेचा ६० वा वर्धापनदिन साजरा होत आहे. मात्र, वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ राबवून चार वर्षांतच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. शुक्रवारी संध्याकाळी सायन येथील षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा तर गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिंदे गटाचा वर्धापनदिनानिमित्त मेळावा होणार आहे. ठाकरे गटाच्या मेळाव्यावर पक्षफुटीचे सावट आहे. त्यामुळे आजच्या भाषणात ठाकरे काय आदेश देतात याकडे ठाकरेंच्या शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. तर ठाकरे गटातील फुटीने शिंदे गटात उत्साह संचारला असून या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पक्षातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी, शुक्रवारी दुपारी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पाटील यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे हे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत.