मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय गणित झपाट्याने बदलत आहेत. महायुतीमध्ये अंतर्गत कलह आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेण्याच्या प्रश्नावरून ठिणग्या उडत आहेत. मुंबई काँग्रेसने 'दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही' अशी भूमिका घेतल्याने तणाव आणखी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काँग्रेसवर टोकाची टीका केली. त्यांनी “शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आहेत, यात कोणाच्या परवानगीची गरज नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
कुणाच्या आदेशाची गरज नाही - राऊत
काँग्रेस मनसेसोबत जाण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या मुंबईतील अनेक नेत्यांनी मनसे सोबत जाण्यास नकार दिला आहे. त्यासाठी आता काँग्रेस दिल्लीतून आदेशाची वाट बघत आहे. मात्र, संजय राऊत यांनी या भूमिकेबाबत X वर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हंटले, "दिल्लीतून आदेश आल्याशिवाय मनसेला आघाडीत घेणार नाही - मुंबई काँग्रेस. हा कॉँग्रेसचा व्यक्तिगत निर्णय असू शकतो शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले आहेत, ही लोकेच्छा आहे. त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही. श्री शरद पवार आणि डावे पक्ष सुद्धा एकत्र आहेत, मुंबई वाचवा!"
शरद पवार युतीबाबत सकारात्मक?
युतीची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी शिवसेना (UBT) आणि मनसे गेल्या काही महिन्यांपासून महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर एकत्र दिसत आहेत. ठाकरे बंधूंच्या पुन्हा जवळ येण्याच्या चर्चा आता अधिक प्रबळ झाल्या आहेत. त्यातच शरद पवार मनसेसोबत जाण्यास सकारात्मक असून डावे दल देखील ठाकरे गटाला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे संकेत राऊतांनी दिले. त्यामुळे आगामी निवडणूकीची समीकरणे आणखी बदलण्याची शक्यता वाढली आहे.
शिवसेना-मनसे जवळीक वाढत असताना काँग्रेस अजूनही निर्णय प्रलंबित ठेवत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेद उघड होत असून काँग्रेस ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.