मुंबई : विधानसभेच्या आगामी निवडणुकीत वरळी मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवाराचे मताधिक्य सात हजारांहून कमी झाल्याने ही योग्य संधी असल्याची जाणीव मनसेला झाली आहे. वरळी मतदारसंघात गगनचुंबी इमारतींसमवेतच बीडीडी चाळी आणि पोलीस वसाहती आहेत आणि त्या मोडकळीस आल्या आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन वरळीला भेडसावणाऱ्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. वरळीशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर शिंदे यांनी या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
राज्यातील सत्तारूढ महायुती आणि मनसे निवणूक एकत्र लढणार की नाही ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप वरळीत आपले अस्तित्व दाखविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करीत आहेत.