मुंबई : सायन पुलाचे काम असून युद्धपातळीवर सुरू पश्चिमेला एक गर्डर लाँच करण्यात आला आहे, तर पूर्वेकडे गर्डर ऑगस्ट महिन्याच्या ८ तारखेला लाँच करण्यात आला आहे. मात्र, गर्डर लाँच केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी मुंबई महापालिकेला ४५ दिवसांचा अवधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे १५ व ३० ऑगस्टचा मुहूर्त हुकला असून आता पूल वाहतुकीसाठी खुला होण्यासाठी सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, विद्याविहार पुलाचे काम जुलै अखेरपर्यंत होणे अपेक्षित होते. मात्र, आता विद्याविहार पूल या दोन्ही पुलांचे काम संथगतीने सुरू असल्याने १५ ऑगस्टला खुला होणारा विद्याविहार पूल सप्टेंबर महिन्यात खुला होण्याची शक्यता आहे.
मेगा ब्लॉकच्या विलंबामुळे पुलाला उशीर
सायन पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर १५ ऑगस्टचा मुहूर्त ठरला होता. मात्र मध्य रेल्वेकडून मेगा ब्लॉकची वेळ निश्चित ठरत नव्हती. मात्र ८ व ९ ऑगस्टच्या मध्यरात्री पूर्वेकडील गर्डर लाँच करण्यात आल्याने पुढील ४५ दिवस मुंबई महापालिकेला उर्वरित कामे करण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे सायन पूल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत नवीन तारीख समोर आली असून सप्टेंबर अखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.