मुंबई : पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी १९ जानेवारी २०२४रोजी मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन पूल पाडण्यात आला. त्यानंतर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केले आणि काही दिवसांपूर्वी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी तब्बल ३० महिन्यांनंतर सायन पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. विद्याविहार, गोरेगाव - मुलुंड लिंक रोडवरील उड्डाणपूल अशा तिन्ही पुलांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी एक वाजता होणार आहे.
सायन पूलाचा लोकार्पण सोहळा दृकश्राव्य माध्यमातून पार पडणार असून, संबंधित ठिकाणी त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. मुंबईच्या पायाभूत सुविधांना गती देण्याच्या दृष्टीने हे तीनही पूल महत्त्वाचे मानले जात आहेत.
प्रवासाचा वेळ, वाहतूककोंडीही होईल कमी
शीव रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यावरील उड्डाणपूल या तीन प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ वाचण्यासह वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग यांना जोडतो. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम भागांदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
सध्या या प्रवासासाठी लागणारा सुमारे ३० मिनिटांचा वेळ कमी होऊन तो १० मिनिटांपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत होईल.